अष्टावक्र गीतेचे वेगळेपण
अष्टावक्रगीता ही उपनिषद काळात रचली गेली. मात्र या ग्रंथास "अष्टावक्र गीता" असे म्हटले गेले.
संस्कृत साहित्याच्या दृष्टीने,वेदांनंतर ब्राह्मणे,आरण्यके उपनिषदे ,आर्ष महाकाव्ये म्हणजे रामायण,महाभारत
आणि तत्त्वज्ञान या क्रमाने एकामागोमाग एक येतात.वेदांमधील यज्ञाच्या कर्मकांडांची माहिती ब्राह्मणांमध्ये
असते. तर आरण्यके ही वेदांच्या अंती येतात.
आरण्यके आणि उपनिषदे ही दोन्ही वेदांच्या शेवटी येणारी असली ,तरी त्यांच्यात सूक्ष्म फरक आहे.
अरण्यकांमध्ये यज्ञाच्या गूढ अशा तत्त्वाचा विचार केला जातो.आरण्यक हे यज्ञ कर्माच्या सूक्ष्म रूपावर
चिंतन करणारे असते.तर उपनिषद ब्रह्म चिंतन करणारे असते.
अरण्यकांचा आणि उपनिषदांचा सर्वात महत्त्वाचा भेद म्हणजे अरण्यकांपर्यंत मनुष्याच्या जीवनाचे ध्येय हे
आनंद आणि स्वर्गप्राप्ती एवढेच होते. यज्ञकर्म हे त्याचे इष्ट कार्य होते. मात्र उपनिषदांनी ज्ञानयज्ञाला श्रेष्ठता
देऊन मोक्ष हेच मनुष्याच्या जीवनाचे सर्वात महत्वाचे असे कर्तव्य ठरवले. उपनिषदांमध्ये ईश्वर,जगत्,
आत्मा(जीव) आणि ब्रह्म यांची चर्चा केली जाते.
ज्यावेळी अष्टावक्र यांचे आजोबा,उद्दालक (आरुणी) छांदोग्य उपनिषद सांगत होते आणि त्यांचे मामा श्वेतकेतू
'तत्वमसि' हे महत्वपूर्ण सूत्र मिळवत होते, अशावेळी उपनिषदा प्रमाणेच गुरु-शिष्य संवादाचे तंत्र असलेल्या,
या समकालीन ग्रंथास मात्र "अष्टावक्र संहिता, अष्टावक्रगीता किंवा कौशिकीय संहीता" असे म्हटले गेले.
उपनिषदांमध्ये रहस्यविद्या,ब्रह्मज्ञान किंवा पराविद्या यांची चर्चा केलेली आहे. अष्टावक्र संहितेमध्ये
आत्मज्ञानाची चर्चा आहे. ज्यावेळी उपनिषदांचा रोख हा,सृष्टी काय आहे ?जीव सान्त आहे की अनंत?
जन्माच्या आधी काय होते ,मृत्यू नंतर काय असेल?जीवन मृत्यू सोबतच संपते का?मृत्युनंतर स्वर्ग मिळतो का?
मिळत असेल तर कसे कळते? यासारख्या प्रश्नांकडे होता.त्यावेळी अष्टावक्र संहितेमध्ये पहिलाच प्रश्न
विचारला आहे की ज्ञान ,मुक्ती आणि वैराग्य कसे प्राप्त होईल .
अष्टावक्र संहिता ही या प्रश्नापासूनच योगपर आणि संन्यासपर अशा उपनिषदां पासून थोडी वेगळी आणि
स्वतःचे वैशिष्ट्य घेऊन आलेली लक्षात येते.
ब्रह्मसुत्रे,उपनिषदे व श्रीमद्भगवद्गीता ही प्रस्थानत्रयी मानली जाते.साधकाच्या यात्रेची सुरुवात येथे होते.
मात्र,जसे कालिदासाचे 'अभिज्ञान शाकुंतल' हे लोकप्रिय काव्य आहे, परंतु विद्वान आणि खरे रसिक हे
'रघुवंशामध्ये' अधिक रमतात. त्याप्रमाणेच अर्जुनाच्या विषाद योगाने सुरू झालेली श्रीमद्भगवद्गीता ही
सर्वांना मोहूवून टाकते, मात्र मुमुक्षु साधक हा भगवद्गीता, उद्धव गीता आणि अष्टावक्रगीता या मार्गाने पुढे जातो.
उपनिषद काळातील असूनही उपनिषद नाही,अद्वैत तत्वज्ञानाची गंगोत्री मानली गेली असूनही दर्शन शास्त्र
नाही, अशी ही मोक्षगीता-अष्टावक्रगीता....
(क्रमशः)
#भारतीय_दर्शन_परिचय -अष्टावक्र गीता २
डॉ.रमा दत्तात्रय गर्गे
No comments:
Post a Comment