Showing posts with label Dr. Rama Garge. Show all posts
Showing posts with label Dr. Rama Garge. Show all posts

Tuesday, 29 October 2019

अष्टावक्र गीता

अष्टावक्र गीता



राजा जनक त्या भयानक जंगलातून पुढे पुढे जात होता।प्रचंड भूक लागलेली होती। जवळ एक लहानशी
तांदळाची पुरचुंडी केवळ होती। त्याने ती पुरचुंडी उघडली। त्यातील तांदूळ पाहून त्याची भूक पुन्हा एकदा
वाढली। आजूबाजूच्या काटक्या त्याने गोळा केल्या। तीन दगडांची चूल मांडली।बाजूलाच पडलेल्या तुटक्या
खापरात त्याने जवळच्या ओढ्यातून पाणी आणले। चकमकीने चुल पेटवली।खापराच्या तुकड्यात तांदूळ
शिजायला टाकले आणि तो वाट बघत बसला। तांदूळ अर्धे शिजून झाले , पांढरा फेस वर येऊ लागला होता।
आता मात्र त्यांना भूक आवरेना। त्याने तांदूळ बोटचेपे झाल्याचे बघितले आणि लगेच आजूबाजूच्या झाडांची
मोठी पाने जमिनीवर पसरली व शिजलेला भात त्यावर पसरला ।आणि थोडा निवला कि खाऊया म्हणून तो
त्या गरम अन्नाचा गंध घेऊ लागला। तेवढ्यात एक मोठा वळू तेथे आला आणि त्याने आपल्या खूरांनी तो
शिजलेला भात मातीत मिसळून टाकला।आता राजा जनकाला काही सुचेना! त्याच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब
गोळा झाले ।हातांना थरथर सुटली ।पावले अडखळायला लागली । एकातरी पानावर थोडासा चांगला भात
शिल्लक आहे का ह्याचा शोध तो घेऊ लागला। मातीमध्ये मिसळलेले भाताचे कण त्याला दिसू लागले। 
भावना अनावर झाल्या आणि तो रडू लागला। आपलाच आवाज त्याच्या कानावर पडू लागला। आणि
हलकेच त्याने डोळे उघडले। आपण आपल्या मंचकावर झोपलेलो आहोत आणि स्वप्न पाहत आहोत हे
त्याच्या लक्षात आले।तो अत्यंत अस्वस्थ झाला।सकाळी उठून राज्यकारभारातील महत्त्वाच्या गोष्टी त्याने
पार पाडल्या ।पण आतला अस्वस्थपणा काही जाईना ।खरा जनक कोणता? दोन ओंजळ अन्नासाठी
अस्वस्थ असलेला की हा आता राज्यकारभार बघणारा ?या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल याबाबत त्याला
दरबारातल्या एकाही विद्वाना विषयी स्पष्ट खात्री वाटेना।शास्त्रार्थ करायला हे सर्व जण उत्तम आहेत, यात
शंकाच नाही। परंतु या अतिशय आतल्या आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची क्षमता या कोणातच नाही। असे
वाटून त्याला वैषम्य आले।

 दुपारी जेवायला बसला।समोर सुवासिक तांदळापासून केलेला भात होता ।पंचपक्वान्ने होती ।उत्तमोत्तम
भाज्या होत्या ।परंतु तो मातीत मिसळलेला भात काही त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हता ।पहिला घास
घेतल्या बरोबर त्याला एकदम आठवले की आर्य बंदिशी चर्चा करायला आलेला तो लहानगा कुरूप यति,
तोच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल !!आपल्या पिताश्रींना, कहोड यांना वरुणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी
त्याने आर्य बंदि जवळ शास्त्रार्थ केला होता। तो नेहमीच्या बौद्धिक वाद चर्चेपेक्षा काहीसा वेगळा होता।
जेव्हा सारेजण त्याच्या आठ ठिकाणी वक्र असलेल्या शरीराकडे बघून हसले होते ,तेव्हा त्यानेही
आपल्याकडे केवळ हसून बघितले होते। आणि खणखणीत स्वरात म्हणाला होता,'राजा तुझ्या दरबारात
विद्वान आहेत असे ऐकून होतो परंतु येथे तर सारेच चामड्याचे जाणकार बसलेले दिसतात !'असे म्हणून
त्याने संपूर्ण दरबाराला विचारात पडले होते!! कोणताही अभिनिवेश नाही,अहंकार नाही।परंतु
आत्मसन्मानाचा लखलखता दिवा शरीर मनाच्या आत पेटत आहे,असे त्याच्या डोळ्यांमधून आणि वाणी
मधून लक्षात येत होते। तोच आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल। पण कुठे असेल तो?
राजाला एकदम आठवले की उद्दालक ऋषींचा मुलगा श्वेतकेतू त्याचा मामा आहे।नक्कीच आश्रमातून
त्याची माहिती मिळू शकेल। राजाने त्वरित घोडेस्वार आश्रमात पाठवले ।आणि अष्टावक्र यांची माहिती
घेऊन येण्यास सांगितले।

घोडेस्वार परतले।

त्यांनी सांगितले की घनदाट अरण्यामध्ये अष्टावक्र यांनी त्यांचा आश्रम उभारलेला आहे।
राजा लवाजम्यासह निघाला। जंगलाच्या सीमेवर आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आतमध्ये 
अंबारी हत्ती तंबू इत्यादी नेणे अवघड आहे ।सारे तेथेच ठेवून सहा घोडेस्वारांसोबत तो पुढे निघाला। 
पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आले की आता येथे एका वेळी एकच घोडा जाऊ शकतो। त्याने सहा 
घोडेस्वार तिथे थांबवले आणि केवळ एकटाच निघाला। बराच पुढे गेल्यानंतर त्याला एका झाडाखाली 
अष्टावक्र मुनी दिसले। त्यांच्या कडे जाण्यासाठी रिकीबीतून उजवा पाय काढून तो त्याने हवेत वर 
घेतला आणि डाव्या पायावर शरीर तोलून तो खाली उतरणार,तेवढ्यात अष्टावक्र म्हणाले, 
"राजन थांब" त्याच आवस्थेत राजा स्तब्ध झाला। डावा पाय रिकिबीत,उजवा पाय घोड्यावरुन 
बाहेर आलेला ,हवेत ,दोन्ही हात घोड्यांवर आणि शरीराचा तोल सावरला।अशा अवस्थेत तो 
अष्टावक्रांकडे पाहू लागला।जरा वेळाने अष्टावक्र म्हणाले,"राजन खाली उतरा!" डावा पाय काढून 
आणि उजवा पाय मागे घेत राजा उतरला। बोधाने भारलेल्या अवस्थेमध्ये राजा मुनींकडे गेला। 
प्रणाम करून आपल्या स्वप्नाची हकीकत सांगून म्हणाला ,"मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत" 
अष्टावक्र म्हणाले "राजन त्यासाठी तुला आश्रमात राहावे लागेल" राजा म्हणाला ,"मी तयार आहे " 
आणि मग या अद्भुत गुरु-शिष्यांच्या संवाद सुरू झाला। यालाच अष्टावक्रगीता असे म्हटले जाते। 

जनकाची परंपरा एकोणीस जनक राजे होऊन गेले असे सांगते । त्यातील एक म्हणजे नरकासुराचा 
प्रतिपाळ करणारा कूर्मावताराच्या वेळेचा राजा जनक आणि दुसरा म्हणजे वैदेही सीतेचा पिता 
जनक हे आपणास ठाऊक असतातच।त्यांच्या याआधीचा हा अष्टावक्र गीतेतला जनक होय।

(क्रमशः)
 #भारतीय_दर्शन_परिचय -अष्टावक्र गीता १

रमा दत्तात्रय गर्गे.

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र आदि शंकराचार्य विरचित देवी अपराध क्षमापन स्तोत्र हे शरणागत भाव दर्शवणारे अत्यंत भावगर्भ आणि स...