Showing posts with label शंकराच्यार्य. Show all posts
Showing posts with label शंकराच्यार्य. Show all posts

Saturday, 30 November 2019

सौंदर्यलहरी (श्लोक क्र. १)

सौंदर्यलहरी : श्लोक क्रमांक १

शिवः शक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं |
न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि ||
अतःस्त्वमआराध्याम हरिहरविरीन्च्यादिभिरपी |
प्रणन्तुम स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति || ||

शब्दार्थ :

शिव हा ज्यावेळी शक्तीने युक्त असतो त्या वेळी तो देवांचा देव महादेव असतो. परंतु शक्तीशिवाय शिव हा इतका निष्क्रिय असतो कि तो स्पंदन करण्यास सुद्धा पात्र नसतो.
शक्ती इतकी सामर्थ्यवान, प्रभावी आहे कि तिची आराधना हरी अर्थात विष्णू, हर अर्थात शिव आणि विरिंची अर्थात ब्रह्मदेव करतात.
माझ्यासारखा यःकश्चित व्यक्ती जर तिला प्रणाम करण्यास, तिचे स्तोत्र रचण्यास किंवा तिचे गुणगान करण्यास प्रेरित होत असेल तर त्याला केवळ माझी पूर्व जन्मातील पुण्याई, पूर्वसुकृताचा प्रभाव आणि तिची माझ्यावरील मातेसमान करुणामयी दृष्टी कारण आहे.

भावार्थ :

वश या धातूपासून शिव हा शब्द निष्पन्न झालेला आहे. विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेल्या इच्छाशक्तीचा तो आश्रय असल्यामुळे त्याला शिव असे म्हणतात. “वष्टि इति शिवःअशी शिव या शब्दाची व्युत्पत्ती आहे. ‘वशधातूचा अर्थ प्रकाशणे असा घेतल्यास वशतिम्हणजेच प्रकाशतो तो शिव. अर्थात स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असलेला परमात्मा असा त्याचा अर्थ होतो. तो स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश आहे इतकेच नसून तो आपल्या प्रकाशाने संपूर्ण विश्वाला सुद्धा प्रकाशित करतो म्हणून त्याला शिव असे म्हटले आहे.
वश या धातूपासून शिव  हा शब्द कसा निर्माण होतो तर त्याला संस्कृत मध्ये वर्णविपर्यय असे म्हणतात. अर्थात याला विपरीत वर्णरचना असे म्हणतात. हिंस् म्हणजे मारणे, ठार मारणे या धातूपासून सिंह हा शब्द बनला. दृश्य पश्य अर्थात पाहणे या पासून शब्द बनायचा असेल तर तो पश्यक असा शब्द असायला हवा परंतु व्यवहारात पश्यक ऐवजी कश्यप हाच शब्द रूढ आहे. याच न्यायाने वश् धातूपासून वर्णविपर्ययाने शिव शब्द निष्पन्न होऊन व्यवहारात रूढ झाला आहे.
शी या धातूचा अर्थ निद्रा घेणे आणि वा या धातूचा अर्थ फेकणे, दूर टाकणे. या दोन धातूंच्या पासून निष्पन्न झालेल्या शब्द शिव चा अर्थ ज्याने अज्ञानरूपी निद्रेला दूर फेकून दिले आहे, जो सदासर्वकाळ जागृत असणारा परमात्मा आहे. हा परमात्माच ब्रह्मा विष्णू आणि शंकर या रूपाने नटतो आणि अखिल विश्वात उत्पत्ती , स्थिती आणि संहार घडवतो. या परमात्म्यात हे सामर्थ्य आले कोठून ? तर हा परमात्मा ज्यावेळी शक्तीने युक्त असतो तेव्हाच तो हे कार्य करण्यास समर्थ होतो
शिव या शब्दाचा विग्रह केला तर श+ + व असा होतो. जर यातील ईकार काढून टाकला तर शव हा शब्द उरतो. हा ईं कार श्रीललितात्रिपुरसुंदरीचा बीज मंत्र आहे.
शिव याला निर्गुण ब्रह्म मानले जाते. ज्यावेळी निर्गुणब्रह्म एकटे असते. ते अनिवर्चनिय असते. निर्गुण, निराकार, पूर्ण ज्ञानघन. या निर्गुण ब्रह्मात विकल्प निर्माण होतो एकोहं बहुस्यामी या इच्छेच्या मुळे त्यात चेतना निर्माण होते. ती चेतना म्हणजे श्री ललितात्रिपुरसुंदरी अर्थात सगुण ब्रह्म आहे. या सगुण निर्गुण ब्रह्माच्या मिलनातून महास्फोट आणि त्यातून विश्वउत्पत्ती झाली असे आपले सनातन मत मानते.
हि चेतना प्रत्येक भौतिक वस्तूला अणूच्या पातळीवर व्यापून असते. त्यांचे सतत विघटन होण्याची प्रक्रिया चालू असते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या उर्जेला आपण स्पंदन असे नाव देतो.
मानवी शरीरात सुद्धा हृदयाची धडधड हि स्पंदने म्हणूनच ओळखली जातात. मानव जिवंत असल्याची खुण म्हणजे त्याच्या हृदयाची स्पंदने आहेत.
स्पंदन हि चेतनेने व्याप्त असल्याची पहिली खुण आहे. स्पंदनहीन शिव हा शवस्वरूप आहे. तो जर स्पंदनास अपात्र असेल तर विश्वाचा सर्व कारभार पाहण्यास सुद्धा अक्षम होईल.
अर्थात शिवाच्या अस्तित्वास कारक असणारी चेतना म्हणजे शक्ती हे श्रीललितात्रिपुरसुंदरीचे रूप आहे. हि विश्वाची आधारशक्ती आहे.
भक्तांची सगळी दुःखे हरण करतो म्हणून श्रीविष्णुं ला हरी म्हटले जाते.
प्रलयकाली सर्व सृष्टीचा संहार करण्याचे कार्य असल्याने महादेवाला हर म्हटले जाते.
विशेषेण रिञ्यति इति विरिञ्यःविशेषेकरून भौतिक सृष्टी निर्माण करतो म्हणून ब्रह्मदेवाला विरिञ्यः असे म्हणतात.
या शिवाय इंद्र, वरूण, कुबेर, अग्नी, वायू इत्यादी देव सुद्धा आपापले अंगीकृत कार्य करत असतात.
या सगळ्या देवांच्या कार्याला कार्यरत करणारी प्रेरणा अर्थात शक्ती हि चैतन्यरूप श्री ललिता त्रिपुर सुंदरी आहे. म्हणून हा सर्व देवगण तिची आराधना करतो. ते करत असलेले अंगीकृत कार्य हि जणू तिचीच उपासना आहे या भावनेतून करत असतात आणि म्हणूनच देवत्वास प्राप्त होतात.
या श्लोकात आदि शंकराचार्य म्हणतात कि हरी,हर आणि विरिञ्य हे केवळ तुझ्या कृपेने कार्यप्रवण झालेले आहेत आणि ईश्वरत्वाला प्राप्त झालेले आहेत. त्या तुझी स्तुती करण्यास, तुला प्रणाम करण्यास, किंवा तुझ्या गुणाचे रूपाचे गुणगान करण्यास जर मी प्रेरित होत असेल तर ते केवळ मला माझ्या पूर्वकर्मांचे मिळणारे फळ नसून तुझी कृपा दृष्टी आहे जेणेकरून मी तुझ्या उपासनेच्या मार्गावर येणास उद्युक्त झालो. तू मला तुझ्या उपासना मार्गावर आणलेस हि तुझीच लीला आहे आणि त्यामुळे मी धन्य झालो आहे.

या श्लोकातील शिव, शक्ती इत्यादी सर्व शब्द हे अभिप्रायगर्भित असल्याने साहित्यशास्त्राच्या दृष्टीने हा परिकरालंकार होतो. श्लोकाच्या पूर्वार्धातील विषय हा उत्तरार्धातील विषयाला कारणीभूत होत असल्याने हा काव्यलिंग हा अलंकार आहे. या शिवाय या श्लोकात श्लेष आणि समासोक्ती हे दोन अलंकार आहेत.    

©सुजीत भोगले.
तळटीप : पहिल्या श्लोकाचे हे विवेचन पुढील लेखात चालू राहील...

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र आदि शंकराचार्य विरचित देवी अपराध क्षमापन स्तोत्र हे शरणागत भाव दर्शवणारे अत्यंत भावगर्भ आणि स...