Showing posts with label डॉ.रमा दत्तात्रय गर्गे. Show all posts
Showing posts with label डॉ.रमा दत्तात्रय गर्गे. Show all posts

Tuesday, 29 October 2019

अष्टावक्र गीता

अष्टावक्र गीतेचे वेगळेपण

अष्टावक्रगीता ही उपनिषद काळात रचली गेली. मात्र या ग्रंथास "अष्टावक्र गीता" असे म्हटले गेले.

संस्कृत साहित्याच्या दृष्टीने,वेदांनंतर ब्राह्मणे,आरण्यके उपनिषदे ,आर्ष महाकाव्ये म्हणजे रामायण,महाभारत
आणि तत्त्वज्ञान या क्रमाने  एकामागोमाग एक येतात.वेदांमधील यज्ञाच्या कर्मकांडांची माहिती ब्राह्मणांमध्ये
असते. तर आरण्यके ही वेदांच्या अंती येतात.

आरण्यके आणि उपनिषदे ही दोन्ही वेदांच्या शेवटी येणारी असली ,तरी त्यांच्यात सूक्ष्म फरक आहे.
अरण्यकांमध्ये यज्ञाच्या गूढ अशा तत्त्वाचा विचार केला जातो.आरण्यक हे यज्ञ कर्माच्या सूक्ष्म रूपावर
चिंतन करणारे असते.तर उपनिषद ब्रह्म चिंतन करणारे असते.

अरण्यकांचा आणि उपनिषदांचा सर्वात महत्त्वाचा भेद म्हणजे अरण्यकांपर्यंत मनुष्याच्या जीवनाचे ध्येय हे
आनंद आणि स्वर्गप्राप्ती एवढेच होते. यज्ञकर्म हे त्याचे इष्ट कार्य होते. मात्र उपनिषदांनी ज्ञानयज्ञाला श्रेष्ठता
देऊन मोक्ष हेच मनुष्याच्या जीवनाचे सर्वात महत्वाचे असे कर्तव्य ठरवले. उपनिषदांमध्ये ईश्वर,जगत्,
आत्मा(जीव) आणि ब्रह्म यांची चर्चा केली जाते.

ज्यावेळी अष्टावक्र यांचे आजोबा,उद्दालक (आरुणी) छांदोग्य उपनिषद सांगत होते आणि त्यांचे मामा श्वेतकेतू 
'तत्वमसि' हे महत्वपूर्ण सूत्र मिळवत होते, अशावेळी उपनिषदा प्रमाणेच गुरु-शिष्य संवादाचे तंत्र असलेल्या,
या समकालीन ग्रंथास मात्र "अष्टावक्र संहिता, अष्टावक्रगीता किंवा कौशिकीय संहीता" असे म्हटले गेले.

उपनिषदांमध्ये रहस्यविद्या,ब्रह्मज्ञान किंवा पराविद्या यांची चर्चा केलेली आहे. अष्टावक्र संहितेमध्ये
आत्मज्ञानाची चर्चा आहे. ज्यावेळी उपनिषदांचा रोख हा,सृष्टी काय आहे ?जीव सान्त आहे की अनंत? 
जन्माच्या आधी काय होते ,मृत्यू नंतर काय असेल?जीवन मृत्यू सोबतच संपते का?मृत्युनंतर स्वर्ग मिळतो का?
मिळत असेल तर कसे कळते? यासारख्या प्रश्नांकडे होता.त्यावेळी अष्टावक्र संहितेमध्ये पहिलाच प्रश्न
विचारला आहे की ज्ञान ,मुक्ती आणि वैराग्य कसे प्राप्त होईल .

अष्टावक्र संहिता ही या प्रश्नापासूनच योगपर आणि संन्यासपर अशा उपनिषदां पासून थोडी वेगळी आणि
स्वतःचे वैशिष्ट्य घेऊन आलेली लक्षात येते.

ब्रह्मसुत्रे,उपनिषदे व श्रीमद्भगवद्गीता ही प्रस्थानत्रयी मानली जाते.साधकाच्या यात्रेची सुरुवात येथे होते.

मात्र,जसे कालिदासाचे 'अभिज्ञान शाकुंतल' हे लोकप्रिय काव्य आहे, परंतु विद्वान आणि खरे रसिक हे
'रघुवंशामध्ये' अधिक रमतात. त्याप्रमाणेच  अर्जुनाच्या विषाद योगाने सुरू झालेली श्रीमद्भगवद्गीता ही
सर्वांना मोहूवून टाकते, मात्र मुमुक्षु साधक हा भगवद्गीता, उद्धव गीता आणि अष्टावक्रगीता या मार्गाने पुढे जातो.

उपनिषद काळातील असूनही उपनिषद नाही,अद्वैत तत्वज्ञानाची गंगोत्री मानली गेली असूनही दर्शन शास्त्र
नाही, अशी ही मोक्षगीता-अष्टावक्रगीता....

(क्रमशः)
#भारतीय_दर्शन_परिचय -अष्टावक्र गीता २
डॉ.रमा दत्तात्रय गर्गे

Sunday, 20 October 2019

भारतीयदर्शन-परिचय : अद्वैत वेदांत (भाग ३)

भारतीयदर्शन-परिचय : अद्वैत वेदांत (भाग ३)


अद्वैत वेदांताला उत्तरमीमांसा असेही म्हटले जाते.
उपनिषदे,ब्रह्मसूत्रे व भगवद्गीता यांना वेदांताची प्रस्थानत्रयी म्हटले जाते.प्रस्थान म्हणजे उगम,सुरुवात !ब्रह्मसूत्रे आचार्य बादरायण यांनी रचली आहेत.त्यावर भाष्य लिहिणाऱ्यास आचार्य म्हटले जाते.  

वेदांताचे प्रमुख आचार्यांची नावे सोबतच्या छायाचित्रात कालखंडासह दिली आहेत.

या सर्व मतांत लोकमान्य विचार हा शंकराचार्यांचा अद्वैतवाद आहे.येथे त्यातीलच तत्वज्ञान आपण पहाणार आहोत.
वेदांत शब्दाचा उल्लेख सर्वप्रथम छान्दोग्य उपनिषदात येतो.वेदांच्या शेवटी येणारा भाग,उपनिषद अशा अर्थाने.

उपनिषदांतील वाक्यांची मीमांसा करून त्यांचा समन्वय बादरायण आचार्यांनी केला.त्या अर्थाने ज्या दर्शनास उपनिषद प्रमाण आहे त्यास वेदांत अशी संज्ञा मिळाली.

     
 ^ ज्यांना वेदांत दर्शनाला अनुसरून साधना करावयाची आहे त्यांच्यासाठी पुढील निकष शास्त्रात सांगितले आहेत।

१.स्वाध्याय -

चार वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद यांचा सम्यक अभ्यास झालेला असावा. सहा वेदांगे माहिती असावीत.ही सहा वेदांगे पुढीलप्रमाणे--शिक्षा,कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद, जोतिष।या साहित्याचे परिशीलन केल्यानंतरच वेदांताची साधना करावी.

२.काम्य आणि निषिद्ध कर्मांचा त्याग -

काम्य कर्मे म्हणजे जमीन,जुमला,सोने नाणे,स्वर्गाची कामना यासाठी केली जाणारी आटाआटी,विविध यज्ञाचे आयोजन इ होय.आणि निषिद्ध कर्मे म्हणजे गोहत्या,व्यवहारात फसवणे इ सारखी कामे होत.त्यांचा सर्वथा त्याग करणे आवश्यक आहे.

३.नित्य आणि नैमित्तिक कर्मांचे अनुपालन -

नित्य कर्मे म्हणजे स्नान,संध्या,भजन,पूजन ,वैश्वदेवइत्यादी होय.हे करीत गेल्याने पुण्य मिळत नाही परंतु न केल्याने  
हानी होते.
नैमित्तिक कर्मे म्हणजे सोळा संस्कारातील कर्मे होय.जसे जात्येष्टि,नामकरण इ.जे काही निमित्ताने केली जातात.
यांतच काही चुकल्यास प्राय:श्चित्त कर्माचाही उपयोग केला जातो.उदाहरणार्थ चंद्रायण व्रत इ.

४.साधनचतुष्टय  -

ज्याला वेदांत दर्शनाची साधना करून मोक्षप्राप्ती हवी आहे, त्याला चार साधने संपत्तीप्रमाणे जतन करावी लागतात.याला अनुष्ठान असे म्हणतात..ती पुढीलप्रमाणे आहेत.

अ--नित्यानित्यवस्तुविवेक--

 साधकाला ब्रह्म ही नित्य वस्तू आहे आणि अन्य सर्व अनित्य आहे हे सतत लक्षात ठेवले पाहिजे.यातच शुद्ध अशुद्ध विवेक,आत्म अनात्म विवेक,श्रेयस प्रेयस विवेक यांचाही समावेश होतो.थोडक्यात नाशवंत आणि परिवर्तनशील बाबी सतत ओळखणे आणि अविनाशी तत्वाला शोधत रहाणे हे पहिले साधन आहे

आ--इह परलोक सुखभोग विराग-

पृथ्वीवरील सुखे आणि अन्यलोकांत मिळणारी सुखे ही दुःखमूलक आहेत असे लक्षात घेऊन त्या विषयी विरक्त राहणे.

इ-शमदमादि साधन संपद् - 

साधकाने सहा संपदा मिळवायच्या आहेत.शम,दम,उपरती,
तितिक्षा ,समाधान,व श्रद्धा!!

शम म्हणजे मनाचा  इंद्रियांच्या प्रवृत्तीवर आतून ठेवलेला निग्रह,दम म्हणजे इंद्रियांवर बाहेरून नियंत्रण ,उपरती म्हणजे विधिवत संन्यास घेणे,तितीक्षा म्हणजे शारीरिक व मानसिक द्वन्द्व प्रतिक्रीया न देता सहन करणे,समाधान म्हणजे चित्त एकाग्र ,स्थिर करणे आणि श्रद्धा म्हणजे वेदांत विचारांवर निष्ठा असणे होय.

ई- मुमुक्षुत्व-

मोक्षाची अनिवार इच्छा!

या नंतर साधकास श्रवण,मनन आणि निदिध्यास करण्याची योग्यता प्राप्त होते.
अहं ब्रह्मास्मि,तत्त्वमसि, जीवो ब्रम्हैवनापर: ,जग्न्मीथ्या या सारख्या उपनिषद वाक्यांचे श्रवण मनन निदिध्यास करण्यात येतो.गुरुकृपे नंतर ब्रह्मसाक्षात्कार होतो.

ब्रह्म,माया,जीव या संकल्पनांचा ऊहापोह पुढील भागात!

(क्रमशः)

डॉ.रमा दत्तात्रय गर्गे.

Friday, 18 October 2019

भारतीयदर्शन-परिचय : अद्वैत वेदांत (भाग २).

भारतीयदर्शन-परिचय : अद्वैत वेदांत (भाग २)

आपल्या शिष्यांसह यतीराज मंडनमिश्र यांच्या माहिष्मती नगरीकडे निघाले।आद्य शंकराचार्यांची चरित्रे लिहिणाऱ्यांनी फार सुंदर प्रतिकांचा वापर करून मंडनमिश्र यांचा महिमा सांगितला आहे.

आचार्य एका पाणवठ्यावर विचारतात,मंडनमिश्र कुठे रहातात?त्यावर पाणी भरणारे पाणके सांगतात,'यतीवर, 
ज्या घरात पोपट आणि मैना यांचे संभाषण सुरू असेल,""वेद स्वप्रमाणित आहेत की नाहीत?कर्माचे फळ कर्मसिद्धांत देतो की ईश्वर?जग नित्य की अनित्य"असे  घर मंडनमिश्रांचे समजावे!!

  त्यांची आणि आचार्यांची भेट,संभाषण हे सारेच चरित्रकारांनी कौशल्याने रंगवले आहे!

  परन्तु आपला विषय दर्शन असल्याने आपण या स्थानी त्यास सामावून घेऊ शकणार नाही।पण ते सर्व हृदयाला आल्हाद देणारे व रंजक आहे!!

 मंडनमिश्र यांना भेटून आचार्य त्यांना कुमारिलांची शेवटची वाणी सांगतात व शास्त्रार्थाची इच्छा प्रकट करतात.मंडनमिश्र यांच्या पत्नी उभयभारती यांनी निर्णय द्यावा असे ठरते।

   वादाची अट होती जो हरेल त्याने विजेत्याचे मत स्वीकारावे!

 मंडनमिश्र हे विशुद्ध कर्मवादी  ,ईश्वर न मानणारे असे वैदिक आचार्य होते तर  आचार्यशंकर हे ज्ञान कर्म आणि उपासनेसह अद्वैत ब्रह्माचे प्रतिपादक होते!

वेदांचे तात्पर्य काय?हा शास्त्रार्थ बिंदू ठरला!

दुसऱ्या दिवशी गहन पंडित्याने भरलेला वाद सुरू झाला!उभयभारती निर्णायक पदी बसल्या!

     
आचार्य शंकर:::

अद्वैत ब्रह्म हेच वेदांचे एकमेव तात्पर्य आहे.कर्म आणि उपासना ही केवळ चित्तशुद्धीची साधने आहेत.त्यामुळे ज्ञान आणि कर्म/ज्ञान आणि उपासना यांचा समुच्चय साधणे मुळात अशक्य आहे.ज्याला मुक्ती मिळवायची असेल त्याने कर्म व उपासनेने चित्तशुद्धी करावी ।नंतर त्याला अहं ब्रह्मास्मि हे ज्ञान स्वाभाविकपणे लाभते।नुसत्या कर्मकांड व उपासनेने प्रत्यक्ष मुक्ती मिळत नाही."

मंडनमिश्र::;:

कर्म हेच वेदांचे तात्पर्य आहे.कर्मामुळे जीवाला अनंत मुक्ती मिळते.ब्रह्म व आत्मा यांच्यात अभेदभावना करण्याविषयी वेदात सांगितले आहे ;; ते कर्म उत्तमपणे साधता यावे म्हणूनच!अनंत काल पर्यंत केवळ कर्म करीत राहिले तरी स्वर्गप्राप्ती होते.कर्माने इष्ट सिद्धी होत असेल तर ज्ञानाचे काय विषेश??"

 अशा रीतीने ब्राह्ममुहूर्तावर सुरू झालेले हे वाक् युद्ध सुरूच राहिले.दुपारी उभयभारती म्हणाल्या ,"तुमचे चालू द्या।मी दुरून ऐकते।मला पतीदेव व अतिथी यांच्यासाठी अन्न तयार केले पाहिजे!"

अशा प्रकारे हा वाद आठ दिवस सुरू राहिला.आचार्य शंकर बोलू लागले की वाटत असे हे तर्कशुद्ध विधान खोडता येणार नाही.पण मंडनमिश्र आपल्या धारधार बुद्धीने ते परतवून लावत!

शेवटचा दिवस उजाडला।

आचार्य शंकर:: 

स्वकल्याणाची इच्छा धरणाऱ्या मनुष्याने कर्मांनी प्राप्त होणाऱ्या सर्व लोकांचे नीट परीक्षण करावे.विवेक करावा व त्यांतील सुखांची अनित्यता लक्षात घेऊन त्यांच्या विषयी विरक्त व्हावे.

अकृत वा नित्य अशा मोक्षाची प्राप्ती कृत कर्माने कधीही होऊ शकत नाही.

मोक्ष हे आत्म्याचे स्वरूपच असून तो तिन्हीत्रिकाल विद्यमान आहे.कोणत्याही कर्माने तो उत्त्पन्न होत नाही.मात्र कर्मामुळे स्वर्गादी फळे मिळतात,त्यांचा वियोगही घडतो।या प्रमाणांवरून कर्माची(वेदोक्त कर्मकांडे)निकृष्ठता दिसते परन्तु वेदांमध्ये ज्ञानाला निकृष्ट मानणारे एकही विधान नाही.यावर तुमचे काय म्हणणे आहे?''

या नंतर मंडनमिश्र यांनी आचार्यांचे चरण धरले व उभयभारती यांनी आचार्य शंकर जिंकल्याचे घोषित केले!

*काही चरित्रग्रंथात आचार्यांनी परकाया प्रवेश करून कामशास्त्राचे ज्ञान मिळवले आदी उल्लेख आहेत.परन्तु येथे अद्वैत वेदांतावर वार्तिक लिहू शकणारी व्यक्ती आचार्यांना मिळाली हे महत्वाचे!!

(क्रमशः)

डॉ.रमा दत्तात्रय गर्गे.

भारतीयदर्शन-परिचय : अद्वैत वेदांत (भाग१)

भारतीयदर्शन-परिचय : अद्वैत वेदांत (भाग१)


सदाशिव समारंभात्।
शंकराचार्य मध्यमात्।
अस्मद आचार्य पर्यंतं।
वन्दे गुरुपरंपराम्।

इसवीसनपूर्व सहाव्या शतकात भ.गौतम बुद्धांनी यज्ञहिंसेचा त्याग करून भारतीयांना नवा मार्ग दिला.

सम्राट अशोक,अजातशत्रू आदी राजांच्या राजाश्रयामुळे बौद्धमताचा प्रचार भारतात,भारताबाहेर सर्वत्र वेगाने झाला.

परन्तु,, जसा गणेशोत्सव विशिष्ट हेतूने सुरू झाला तरी सध्या त्याचे अनेकतोंडी रूप झाले आहे,तसे काहीसे या विप्लवात घडले.समाजाची घडी विस्कळीत झाली."इंन्द्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा"या प्रमाणे वेदांविरुद्धच्या बंडात याच रचनेच्या आधारे उभा असणारा सामाजिक जीवनाचा पाया खिळखिळा होऊ लागला.साधारणपणे पहिल्या शतकापासून लोकांमध्ये पुन्हा वेदांकडे जाण्याचा कल वाढू लागला.

 पहिल्या शतकात जेमिनी यांनी मिमांसासूत्रे रचली.वेदांच्या कर्मकांडातील म्हणजे,संहिता आणि ब्राह्मणे यांमधील वचनांचा समन्वय करणारे शास्त्र निर्माण झाले!

वेद वचनांमधील अंतर्विरोध नाहीसा करून श्रुती,स्मृती,पुराणोक्त विधींची रचना लावण्यात आली.त्या आधारे समाजातील वेदनिष्ठा वृद्धिंगत केली गेली.ही परंपरा आठव्या शतकापर्यंत सुरू होती.

वार्तिके,भाष्ये,अर्थशास्त्र,स्मृति,पुराणे यांच्या रचना झाल्या.चंद्रगुप्त, चाणक्य,विक्रमादित्य, शालिवाहन, हर्षवर्धन ,पुलकेशी या यशस्वी राजांचा हा कालखंड !!

ग्रीक हुण शक यांच्या आक्रमणांना परतावून लावून भारतात सुवर्णयुग रचले गेले !!
      

आठवे  शतक उजाडले!!ज्यांचे मिमांसासूत्रांवरील मत भाट्टमत म्हणून सर्वत्र स्वीकारले जात होते,अशा कुमारिल भट्टांच्या कुळात त्यांच्या पुतण्याने,बौद्धमत म्हणजेच नास्तिक धर्म(वेद मान्यता नसणारा)स्वीकारला!

त्याचे नाव धर्मकीर्ती..कुमारिल भट्ट रागावले!रागावलेल्या आपल्या चुलत्याला त्याने सांगितले ''निषेध्य बोधाद्धी निषेध्य बाध''असेच म्हणतात ना मिमांसेत. मग खंडन करण्याआधी त्या मताचे पूर्ण ज्ञान मिळवा.

वयाच्या चौथ्या दशेत कुमारिल ज्ञान मिळवण्यासाठी सिद्ध झाले!त्यांनी नालंदा ज्ञानपीठातील मुख्य आचार्य धर्मपाल यांचे शिष्यत्व पत्करले.अटीनुसार ते बौद्ध झाले!तेथे अभ्यासा बरोबरीने चालणारी वेदनिंदा ऐकून त्यांचे मन विदीर्ण होत असे.

 कोणता पंथ श्रेष्ठ हे त्या काळात शास्त्रार्थ करून ठरत असे.

 शिक्षण पूर्ण झाल्यावर विशाल सभेचे आयोजन करण्यात आले.ठरल्याप्रमाणे वाद झाला.कुमारिलांच्या प्रतिभेमुळे त्यांचा विजय झाला.बौद्ध आचार्य धर्मपाल पराभूत झाले.

मात्र धर्मपाल यांची मती बुद्ध,धम्म आणि संघापासून ढळली नाही.त्यांनी परमत न स्वीकारता प्राणत्याग केला.

नंतर कुमारिलांनी अनेक ठिकाणी शास्त्रार्थ केले व विजय मिळवले!

 मात्र आपल्या बौद्ध गुरूंना आपल्यामुळे जीवनाश करावा लागला आणि काही काळ आपण ईश्वर व वेदांना नाकारले या दोन दोषांचे प्राय:श्चित्त म्हणून त्यांनी तुषानलात प्रवेश करण्याचे ठरवले.

 सर्व बाजुंनी तांदळाच्या कोंड्याचा ढीग करून त्यात वृद्ध कुमारिल भट्ट यांनी प्रवेश केला.अग्नी पेटवण्यात आला.

 त्याचवेळी एक तेजस्वी यती तेथे आला.तो आचार्यांना म्हणाला,''हे पंडिताग्रणी ,अद्वैत सिद्धांताच्या प्रचारासाठी मी प्रस्थानत्रयीवर भाष्ये लिहिली आहेत.आपण अद्वैत मत स्वीकारून या भाष्यांचे वार्तिक लिहावे ही विंनती करण्यासाठी मी येथे आलो आहे•।माझ्या कमंडलूतील जलाचे सिंचन करून हा अग्नी क्षणात शांत करतो"

(प्रस्थानत्रयी म्हणजे ब्रह्मसुत्रे,गीता,उपनिषदे,
आणि वार्तिक म्हणजे खंडनमंडनात्मक स्पष्टीकरण) 

त्यावर कुमारिल शांतपणे म्हणाले,"हे यतीराज,हा तुषानलप्रवेश वेदोक्तव्रताचा परिपाक आहे!मला गुरुहत्येचे आणि पथभ्रष्टतेचे प्राय:श्चित्त घेऊ द्या!आपण माझा शिष्य मंडनमिश्र याचेकडे जावे.तो माझ्यापेक्षा कशातच उणा नाही!आपण माझ्यासाठी तारक ब्रह्माचे नामोच्चार करावे!आता अग्नी वाढत आहे.""

एक आदर्श सनातनी महापुरुष सत्यपालनासाठी आत्मसमर्पण करत होता!अखेरीस अग्नी आतून पेटत गेला व गंभीरपणे तारकब्रह्म नामोच्चार ऐकत कुमारिलांचा जीव शरीर सोडून गेला...!

आणि तो तरुण यती,आचार्य शंकर ; मंडनमिश्र यांच्याकडे जाण्यासाठी निघाला..प्रस्थानत्रयी वरील भाष्ये घेऊन!!

(क्रमशः)

डॉ.रमा दत्तात्रय गर्गे.

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र आदि शंकराचार्य विरचित देवी अपराध क्षमापन स्तोत्र हे शरणागत भाव दर्शवणारे अत्यंत भावगर्भ आणि स...