Showing posts with label स्वागत लेख. Show all posts
Showing posts with label स्वागत लेख. Show all posts

Sunday, 20 October 2019

तत्वमसि


तत्वमसि

तत्वमसि = तत् + त्वं + असि

असा विग्रह होतो. अर्थात तो तूच आहेस.

हे वेदातील महावाक्य आहे. याचे विवेचन छांदोग्य उपनिषदात आले आहे. हे महावाक्य तुम्हाला अद्वैत सांगते.
गम्मत पहा. वेदांची विचार करण्याची पद्धत पहा. आहे एकच शब्द आणि त्याचा उल्लेख काय ? महावाक्य.
महावाक्य का ? तर ते मांडत असलेला विचार सर्वव्यापी आहे. काळाचे पडदे फाडून सर्वकाल सत्य राहणारा आहे. म्हणून हे महावाक्य आहे.

तो तूच आहेस म्हणजे काय ? तर ज्याला तू ईश्वर जगन्नियंता परमेश्वर आणि उपास्य मानतो आहेस तो तुझ्यापासून भिन्न नाही तो तूच आहेस. फक्त तुला तुझे हे ईश्वरी स्वरूप जाणून घेणे आवश्यक आहे.
ज्याक्षणी तू तुझ्यातीलच या ईश्वरी स्वरूपाला जाणून घेशील तुझा ईश्वराचा बाहेर चालू असलेला शोध थांबून तो अंतर्मुख होईल. अंतरीच्या मध्ये सुरु झालेला हा शोध तुझ्यातील ईश्वरी तत्व जागृत करत अंतिमतः तुला अंतर्बाह्य पूर्ण ईश्वरस्वरूप करूनच थांबेल.

स्वतःतील ईश्वरी अस्तित्वाला शोधण्याची जी विद्या आहे ती अपरा विद्या. जी सर्व भौतिक, प्रापंचिक ज्ञान देणाऱ्या विद्यांच्या पेक्षा पूर्ण भिन्न आहे. हि विद्या या सगळ्या भौतिक प्रापंचिक ज्ञान देणाऱ्या विद्यांचा छेद करते. त्यांना नष्ट करते. या सर्व परा विद्या नष्ट झाल्याखेरीज अपरा विद्येचा उदयच होत नाही. पण या अपरा विद्येकडे जाण्याचा सगळा मार्ग हा पराविद्येवर प्रभुत्व मिळवत टप्याटप्याने प्राप्त होतो. म्हणजे पहिले पराविद्येत सर्वज्ञ व्हायचे आणि मग मिळवलेले सर्व ज्ञान नेती नेती म्हणून नाकारायचे आणि त्या पलीकडे काय आहे याचा शोध घ्यायचा. अत्यंत कष्टाने ज्ञान प्राप्त करणे आणि त्याचा त्याग करत अंतर्मुख होत एका पूर्ण वेगळ्या ज्ञानाचे गवाक्ष उघडणे हे शब्दांच्या पातळीवर फार सोपे वाटेल पण हे फार फार कठीण आहे.

ज्ञान एकटे येत नाही ते त्याच्या असण्याचा अहंकार सुद्धा घेऊन येते. ज्ञानाचा त्याग करायचा याचा खरा अर्थ ज्ञान प्राप्तीच्या अहंकाराचा त्याग करायचा. जोवर हा त्याग साधत नाही तोवर अपरा विद्येला शिकायचा प्रारंभच होत नाही.

परा विद्येत काय येते ? वेद , उपनिषद, छंद , न्यास , निरुक्त, व्याकरण, दर्शनशास्त्र सुद्धा . हे सगळेच्या सगळे ज्ञान कसे जगावे, कसे उत्तमपणे जगावे, आपल्या सभोवताली असणारे भौतिक विश्व कसे आहे या बद्दल माहिती देणारे भौतिक पातळीवरील ज्ञान आहे. यात पूर्णत्व मिळवणे आणि नंतर त्याचा हेतुपुरस्सर त्याग करून नेती नेती चा विचार मांडत त्या निर्गुण निराकाराचा शोध सुरु करणे हा शोध बहिर्मुख नाही अंतर्मुख आहे आपल्याच आत तो आहे.

प्रचंड कष्ट करून हे ज्ञान मिळवायचे मेंदूला त्याच्या क्षमतांच्या मर्यादांच्या पर्यंत पोचवत हे ज्ञान आत्मसात करायचे आणि मग त्याचा त्याग करायचा ? मग हे ज्ञान ग्रहण करायची गरजच काय ? तर हे ज्ञान प्राप्त करताना आपल्या मेंदूचा आपल्या  संपूर्ण व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण विकास होतो. नंतर मांडला जाणारा निर्गुण निराकार अश्या ईश्वरी तत्वाचा आपल्या अंतर्गत शोध घेण्याचा जो विचार आहे त्या विचाराला आत्मसात करू शकणारी वैचारिक बैठक आपल्या मनात तयार होते.

ज्यावेळी आपण प्राप्त ज्ञान त्याग करण्याचा विचार करतो त्यावेळी त्या ज्ञानाच्या प्राप्तीच्या मार्गात आलेल्या अनुभूती आणि त्या ज्ञानाच्या प्राप्तीच्या टप्प्यात सुद्धा ठिकठिकाणी मांडला गेलेला “तत्वमसि = तत + त्वं + असि” हा विचार आपल्याला अधिकाधिक स्पष्टपणे उमटलेला दिसतो.

मग आपल्याला साक्षात्कार होतो अरेच्या हे सगळे परा विद्येचे ज्ञान सुद्धा दृष्टांत स्वरूप आहे या ज्ञानातून सुद्धा अंतिम सार काढले तर हेच निघणार आहे पण आपण ज्ञान प्राप्त करतो आहोत या अहंकाराच्या आहारी जाऊन त्यातील हे महावाक्य रुपी सार आत्मसात करण्यात त्या वेळी अपयशी ठरलो आता आपल्याला ते महावाक्य फक्त आत्मसात करायचे आहे... आणि त्या अर्थाने सर्व प्राप्त ज्ञान त्यागून महावाक्याचेच ज्ञान हे चिरंतन ज्ञान म्हणून हृदयस्थ ठेवायचे आहे.

त्या ईश्वरी शक्तीचा  शोध घेणे आणि शोधून झाल्यावर “तत्वमसि = तत + त्वं + असि” ची मूर्तिमंत अनुभूती घेणे हेच मानव म्हणून आपल्या जीवनाचे उद्दिष्ट आहे.

वैदिक काळातील ऋषींची हि विचारसरणी, तात्विक चिंतनाची पद्धत आणि बैठक समजून घेणे हेच एखाद्या जन्मातील संचित असू शकते. ते ज्या पद्धतीने जसा विचार करत आणि व्यक्त करत ते समजून घेणे हीच एक मोठी साधना आहे. आजच्या तथाकथित विचारवंत मंडळींना नेमके हेच साधत नाही आणि सगळ्या अर्थाचे अनर्थ होऊन बसतात.

आज सामान्य हिंदू लोक वेद, उपनिषद, दर्शनशास्त्रे या आपल्या मुख्य ज्ञानाच्या पासून फार दुरावले आहेत. त्यामुळे आपल्या धर्माची मूळ तत्वे आणि त्याची वैचारिक बैठक याची आपल्याला जाणीवच नसते. समोर दिसणारा कर्मकांड रुपी, पापभिरू, मूर्तिपूजक धर्म हीच आपली धर्म संकल्पना आहे हा आपल्याला भ्रम झाला आहे.

धर्माचे मूळ विशुद्ध आणि सच्चिदानंद स्वरूप आपल्या प्रत्येक हिंदूला उमजावे, समजावे आणि आत्मसात व्हावे म्हणून आम्ही तत्वमसि या ब्लॉग आणि मासिकाचा खटाटोप करतो आहोत.

मासिक सुरु करण्याच्या मार्गातील अडचणी संपायला तयार नाहीत आणि आम्ही घोषणा करूनही मासिक सुरु करत नाही आहोत याचे आमच्यावर प्रचंड नैतिक दडपण आले आहे. त्यामुळे सहज शक्य असणाऱ्या ब्लॉग च्या स्वरूपात सेवा सुरु करण्याचे आम्ही ठरवले आहे आणि आजपासून आमचा ब्लॉग आपल्या सेवेत रुजू करतो आहे.

भगवती ची कृपा झाली कि मासिक सुद्धा सुरु होईलच. मासिकात जो मजकूर असेल तोच मजकूर तुम्हाला ब्लॉग वर पण मिळेल. पण ब्लॉग हा आठवड्याने अपडेट होणार आहे त्यामुळे अन्य भरपूर लेख तुम्हाला ब्लॉग वर वाचायला मिळतील.

ब्लॉग वरील सर्व लेखन हे मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषात भावार्थ अनुवाद करून आपल्याला देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

या कार्यात माझ्या सह काही अन्य विदुषी आणि हिंदुत्ववादी लेखक सुद्धा जोडले जात आहेत. प्रत्येक जण त्याच्या क्षेत्रात मापदंड आहेत. इतके थोर लोक माझ्या कार्यात काहीही किंतु परंतु न करता जोडले गेले हे त्यांच्या ज्ञानघन, निगर्वी स्वभावाला अनुसरूनच आहे. त्यांचे ऋण शब्दात मांडणे अशक्य आहे.

एका शब्दात सांगायचे तर आम्ही ज्ञानाचा सेतू बनवायला घेतला आहे. अन्य ज्ञानी मंडळी त्यांच्या ज्ञानाच्या मोठ्या शिळा आणून टाकत आहेत आणि मी माझ्या परीने खारीचे कार्य करतो आहे.

मला खात्री आहे आमच्या या प्रयत्नाचा सामान्य हिंदू जनांना लाभ होईल आणि आपल्या सर्व धर्मविषयक शंकांचे इथे निरसन होऊन आपली धर्मावरील श्रद्धा अधिक मजबूत आणि अधिक डोळस होईल.

आपल्या संत आणि योगी मंडळींनी जे तत्त्वज्ञान सांगितलं आहे, तेच एका सुपरिचित आणि आपल्या अत्यंत आवडत्या गीतात आपण ऐकत आलो आहोत. त्या गीताने या लेखाची सांगता करू ...

कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

झाड फुलांनी आले बहरून तू न पाहिले डोळे उघडून
वर्षाकाळी पाउसधारा तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेवून नांगर हाती पिकाविलेस मातीतून मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

देव बोलतो बाळ मुखातून देव डोलतो उंच पिकातून
कधी होवुनी देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी
अवतीभवती असून दिसेना शोधीतोस आकाशी 
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी 
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

(गीत - मंगेश पाडगावकर)


जय माता दि...

-- सुजीत भोगले

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र आदि शंकराचार्य विरचित देवी अपराध क्षमापन स्तोत्र हे शरणागत भाव दर्शवणारे अत्यंत भावगर्भ आणि स...