Showing posts with label वरदवाणी. Show all posts
Showing posts with label वरदवाणी. Show all posts

Tuesday, 15 October 2019

वरदवाणी (५)


वरदवाणी (५)🚩

हिंदू धर्म समजून घ्या -

एक वृद्ध गृहस्थ होते ते पुन्हा पुन्हा आजारी पडायचे. डॉक्टरकडे जाऊन औषध घेतले की तेवढ्यापुरते त्यांना बरे वाटायचे. म्हणून ते एकदा नुकत्याच,अमेरिकेतील पदवी घेऊन आलेल्या डॉक्टरकडे गेले, व म्हणाले,  'मला औषध घेतले की तेवढ्यापुरते बरे वाटते, नाही घेतले तर मी पुन्हा आजारी पडतो. हे असे का होते सांगाल का? तुम्ही परदेशात शिकून नुकतेच परत आलेले आहात. तेथील वातावरणामुळे तुमचे ज्ञान अद्यापि दुषित झालेले नाही, ताजेताजे आहे, म्हणून तुमच्याकडे आलो. आता तुम्ही तरी योग्य ते सांगाल असा विश्वास आहे.' त्या (इम्पोर्टेड) डॉक्टरांनी त्या वृद्ध गृहस्थाचे पाच-दहा हजार रुपये खर्चून सर्व तपासण्या केल्या आणि मोठ्या गंभीरपणे सांगितले की, 'तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडता याचे कारण तुम्ही जिवंत आहात.' (सर्व श्रोते लोक मोठ्याने हसतात) मला सांगा का हसलात? डॉक्टरच्या या विधानात खोटे काहीच नाही. मेलेला मनुष्य कधी आजारी पडतच नाही. तो जिवंत असतो म्हणूनच आजारी पडतो. यावर उपाय म्हणजे त्याला मारुन टाकणे; म्हणजे तो पुन्हा आजारी पडण्याची शक्यताच नाही. हिंदु धर्माविषयी बोलणारे तथाकथित बुद्धिवादी या डॉक्टरच्याच जातीचे आहेत. अरे! आम्ही टिकून आहोत. याचे काही वैशिष्ट्य आहे की नाही? आणि हे केवळ मीच म्हणतो असे नाही तर महमंद इकबाल, जेव्हा त्यांचे डोके ठिकाणावर होते, तेव्हा असेच म्हणत होता.

यूनान, रोम, मिस्र सब मिट गये जहाँसे।
कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी ।।

रोम, मिस्र, युनान गेले. या भूमीवरुन सगळे नाहीसे झाले पण हिंदूचे वैशिष्ट्य आहे की, 'कुछ बात है कि हस्ती मिटती नही हमारी।' याच महमंद इक्बालने म्हटले की "सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा". कारण परदेशामध्ये शंभर-सव्वाशे वर्षांच्या आक्रमणाच्या काळात काही संस्कृती पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत. इथे मात्र 

दिने हजाजी का बेबाक बेडा
न जेहूमें ठहरा ना सेहूमें अटका।
किये पार जिसने सातो समंदर
वो डुबा दहाडेमें गंगामें आकर ॥

असे एका हाली नावाच्या मुसलमान कवीनेच वर्णन केले आहे. इंग्रजाने म्हटले, मुसलमानाने म्हटले; असे म्हटले की, ऐकणारांना बरे वाटते. कुणी हिंदू कवीनी संस्कृतात सांगितले आहे, असे म्हटले की तो जातीयवादी ठरण्याची शक्यता आहे. तो मुसलमान कवी हाली म्हणतो
- सगळ्या पृथ्वीवर दौड करणारा आमचा हा घोडा हिंदुस्थानातील गंगेच्या डोहात बुडून गेला.

मुसलमानांचे साम्राज्य सातशे वर्षे असून, औरंगझेब, अल्लाउद्दीन यासारख्या क्रूरतम मुस्लिम राजांनी राज्य करुनही आजही हिंदू बहुसंख्येने टिकून आहेत. "कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी|" आजही रामजन्मभूमीकरता झालेला संघर्ष एवढया मोठ्या प्रमाणावर होईल असे मलाही वाटले नव्हते. विश्व हिंदू परिषदेचे प्रेरणेने मेळावा दिल्लीला भरला तर पंचवीस लाख हिंदू जमा झाले. अगदी खत्रुड वर्तमानपत्रानेही पंधरा लाखाचा आकडा दिला आहे. यासाठीच",कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी" हे मानले पाहिजे.

(क्रमशः)
प.पू.ब्र.स्वामी वरदानंद भारती

वरदवाणी (४)


वरदवाणी (४) 🚩



अधर्माशी अधर्माने वागणे, अन्यायाशी अन्यायाने वागणे यात काहीच अधर्म नाही. धर्माच्या ढालीचा उपयोग त्यानेच करावा की ज्याच्या हाताच्या तलवारीला नितीची धार आहे आणि न्यायाची मूठ आहे,ज्याचे वर्तन सदाचाराची मर्यादा मानणारे आहे.

[भगवान श्रीकृष्ण-एक दर्शन]

प.पू.ब्र.स्वामी वरदानंद भारती

वरदवाणी (३)


वरदवाणी (३)🚩

हिंदू धर्म समजून घ्या - .

रमणमहर्षीच्या दर्शनाला कोणी गेले की ते म्हणत - नो दायसेल्फ (Know thyself) तू स्वतःला समजून घे.

खरोखरीच सगळ्या आपत्तीचे, सगळ्या संघर्षाचे, सगळ्या कामक्रोधाचे मूळ या 'मी' च्या अज्ञानामध्ये आहे. हे समजून घेणे व्यक्तीच्या पातळीवर जेवढे आवश्यक आहे तेवढेच समष्टीच्या पातळीवरही आवश्यक आहे, राष्ट्राच्या पातळीवरही आवश्यक आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही हिंदू अजूनही बहुसंख्य आहोत याचे कारण काय, ते समजून घेतलेच पाहिजे, हिंदूच्या वर आपत्ती आल्या त्या शिकंदरच्या काळानंतर, त्याआधी हिंदू साम्राज्यात सोन्याचा धूर निघत होता असे इतिहास सांगतो. पण शिकंदरच्या मागे जाऊन विचार करण्याची आवश्यकताच वाटत नाही की जो भारतीय सीमेच्या आत फारच थोडा प्रवेश करु शकला. आज हे सगळे सांगायची काही आवश्यकता नाही. सुदैवाने शासनाला सद्बुध्दी सुचली आणि दूरदर्शनवर 'चाणक्य' दाखविले जाते त्यातून यासंबंधीची माहिती सर्वांना मिळते आहे.

मी एका अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांना विचारले होते की, तुम्ही चाणक्याचे अर्थशास्त्र, आणि शुक्रनीती वाचले आहे का ? त्या प्राध्यापकांनीच मला विचारले 'चाणक्य ही काय भानगड आहे ?' मी कपाळाला हात लावला. त्या प्राध्यापकांनी, आपला जो विषय आहे, त्याच मूलभूत ज्ञान करुन ध्यायला हवे. की, पगारवाढीकरता नुसते संपावर जावे? प्राध्यापकालाच एखाद्या विषयाची सखोल माहिती नसल तर विद्यार्थ्याला ती कशी असणार? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?

मी हे सांगत होतो, एवढ्यासाठी की प्रदीर्घ कालानंतरही आम्ही जसेच्या तसे टिकून आहोत, बहुसंख्येने जिवंत आहोत हे महत्वाचे आहे की नाही?

(क्रमशः)

प.पू.ब्र.स्वामी वरदानंद भारती

वरदवाणी (२)


वरदवाणी (२)🚩

'हिंदू धर्म समजून घ्या' - .

माझे व्यक्तिश: एक मत निश्चित झाले आहे की, आपल्या समाजाची, आपल्या धर्माची ज्यांना चिंता नाही, भविष्यकाळ उज्ज्वल असावा म्हणून काही केले पाहिजे, काही करणे आवश्यक आहे, असे ज्यांना वाटत नाही, असा सगळ्या जगाच्या पाठीवर कोणता समाज असेल तर तो माझा आहे, हिंदूंचा आहे. बाकीचे सगळे लोक आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय सावध असतात. खिश्चन सावध असतात, मुसलमान सावध असतात. मुसलमान तर त्या सावधपणापायी फार हळवेही बनतात. उलट बाजूनी आम्ही इतके निगरगट्ट झालो आहोत की, काहीही केले तरी आमच्या अंगावर ओरखडा उठला असे कधी आम्हाला वाटत नाही.

श्री. पु. ना. ओकांचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्या पुस्तकामध्ये महंमद हा जन्माने हिंदू होता आणि काब्याचे मंदिर पूर्वी शिवमंदीर होते, असा उल्लेख आहे. महंमदाचा जन्मच जर चौदाशे वर्षांपूर्वीचा असेल तर त्याच्या आधी जो धर्म होता तो हिंदूधर्माशिवाय कोणता धर्म होता? तो कालाचा विचार करिता ज्यू किंवा खिश्चनही असू शकेल वा तसा कोणत्याच प्रसिद्ध धर्माचा अनुयायी नसेल, तर रानटी समाजातही महंमदाचा जन्म झालेला असेल. पण महमंद पैगंबर जन्माने हिंदू असण्याची शक्यता आहे, याला कारण महमदाच्या सख्ख्या चुलत्याचे अरबी भाषेतील एक पद प्रसिद्ध आहे, जे शंकराच्या स्तुतिपर आहे. हे पद एका साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते, तर त्याकरिता आपल्या मायबाप सरकारने(तीस वर्षांपूर्वीच्या) ते साप्ताहिकच जप्त केले. आजची परिस्थिती अशी असल्याने खरोखरीच हिंदू धर्म म्हणजे काय हे समजावून घेण्याची वेळ आपल्यावर आली आहे. वास्तविक असे होऊ नये.

पण पुष्कळ वेळा असे होते की जे फारसे महत्वाचे नाही ते समजून घेण्याचे कुतूहल माणसाच्या ठिकाणी असते. पण मूलभुत असले अधिष्ठानाविषयी मात्र कुतूहल असत नाही. अंतराळयाने जेंव्हा आकाशात उडाली तेंव्हा चंद्रशेखर रमणांसारखा शास्त्रज्ञाने म्हटले आहे की विज्ञानाचा उपयोग करुन अनेक सामाजिक प्रश्न सोडविता येण्यासारखे असताना अंतराळयाने आकाशात उडविण्याचा व्यर्थ खर्च कशाकरता करावयाचा? आणि हे कुणा कीर्तनकाराने प्रवचनकाराने म्हटलेले नाही. कोणा संन्याशा-बैराग्याने म्हटलेले नाही, हे आणखी लक्षात ठेवले पाहिजे.
(क्रमशः)

[हिंदू धर्म समजून घ्या]

प.पू.ब्र.स्वामी वरदानंद भारती

वरदवाणी (१)


वरदवाणी (१)🚩

सज्जनहो !

'हिंदू धर्म समजून घ्या' हा आजच्या व्याख्यानाचा विषय असला तरी गेली चाळीस वर्षे मी माझ्या शक्तीप्रमाणे हिंदू धर्मच समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आलो आहे. जे काही ग्रंथलेखन झाले त्यातही मी हाच विषय निरनिराळ्या स्वरुपात स्पष्ट केला आहे. त्यातही कीर्तनातील पुर्वरंगाच्या 'पुर्वरंगतरंग' 'पुर्वरंगतरंगिणी' आणि 'वाटा आपुल्या हिताच्या' या पुस्तकांतून मी हा विषय सविस्तर मांडला आहे.

'हिंदू धर्म समजून घ्या' या एका वाक्यात अनेक प्रश्न अंतर्भूत होतात. हिंदू धर्माचे स्वरुप काय ? हिंदू धर्माची किंवा हिंदुत्वाची व्याख्या काय ? हिंदू धर्माची व्यापकता किती? असे पुष्कळ प्रश्न उपस्थित होतात. स्वा. सावरकरांनी हिंदू शब्दाची जी व्याख्या केली आहे त्यापेक्षा अधिक
लहान, अधिक चांगली आणि अर्थदृष्ट्या अधिक व्यापक व्याख्या,व्यक्तिशः माझ्या प्रत्ययाला आलेली नाही. ते म्हणतात :

आसिंधु -सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।
पितृभूः पुण्यभूः चैव स वै हिंदुरिति स्मृतः॥

लो. टिळकांनीही हिंदू शब्दाची व्याख्या केली आहे. पण ती वैदिक परंपरेपुरती मर्यादित आहे. ते म्हणतात :

प्रामाण्यबुद्धिवेदेषु साधनानामनेकता।
उपास्यानामनियमः हिंदुधर्मस्य लक्षणम्॥

त्यामुळे आपण आज मानतो किंवा शासन मानते त्यापेक्षा या हिंदुच्या परंपरेचे स्वरुप वेगळे आहे. शासनाने तर हिंदूची व्याख्या न करताच हिंदू कोड बिल मात्र पास केले आहे. लोकशाही राज्यामध्ये लोकांचा विरोध असताना, प्रत्यक्ष राष्ट्रपतीचाही विरोध असतांना केवळ नेहरुंच्या हट्टामुळे ते बिल पास झाले. त्या बिलामध्ये हिंदू कोणाला म्हणावे याचे गमतीचे वर्णन आहे. जे ख्रिश्चन, मुसलमान, पारशी, ज्यू यांच्या व्यतिरिक्त आहेत त्यांना हे बिल लागू होईल. ज्या देशामध्ये हिंदू समाज बहुसंख्य आहे, त्या हिंदू समाजाला, त्याची स्वतःची ओळख सांगणारी व्याख्या नसणे हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे.

स्वा. सावरकरांसारख्या थोर पुरुषांनी केलेली हिंदूची व्याख्या ही शासनाला मान्य करावीशी न वाटणे हे शासनाचे दुर्दैव आहे. 'हिंदू धर्म समजून घ्या' अशा विषयावर आजही व्याख्यानमाला आयोजित कराविशी वाटत असेल तर हीही परिस्थिती फार चांगली आहे असे म्हणता येणार नाही. आता अलीकडे एका लहानशा गटात आपण हिंदू आहोत किंवा हिंदू आहोत असे म्हणणे गर्वाचे आहे, अभिमानाचे आहे, अशा घोषणा केल्या जातात. एरवी हिंदू म्हणवून घेणे हे हिंदू समाजातीलच लोकांना लाजिरवाणे वाटत असते. राजकीय क्षेत्रात तर ते तसे होतेच. त्याची आज कारणमीमांसा करण्याचे आपल्याला काही कारण नाही.

(क्रमशः)

[हिंदू धर्म समजून घ्या]
प.पू.ब्र.स्वामी वरदानंद भारती

Monday, 14 October 2019

वरदवाणी

आज अनंत चतुर्दशी, प.पू.अप्पांची जन्मतिथी,त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आरंभ. त्या निमित्ताने त्यांच्या वाणीतून प्राप्त झालेल्या मौक्तिकांचं वाचन, मनन आपल्या कडून घडावं, यासाठी ही लेखमाला.





वरदवाणी 🚩

।। श्रद्धा ।।

श्रद्धा हे माणसाचे वैशिष्ट्य. श्रद्धा ज्याच्या अंतकरणात नाही; असा मनुष्य सापडणे कठीण. मी नास्तिक आहे, माझी कशावरही श्रद्धा नाही असे म्हणणारी माणसे खुप आढळतात; पण ते खरे नसते! पैकी कित्येकजण घरी वास्तुशांती करतात, सत्यनारायणाची पुजा करतात, कधी आईच्या इच्छेखातर, तर कधी बायकोच्या इच्छेखातर वा आग्रहाखातर असे सांगतात.

बुद्धीचे कार्य संपले-थांबले म्हणजे श्रद्धेचे कार्य आरंभते. श्रद्धा ही महाराणी आहे. तिला जेथे वावरायचे आहे तेथे स्वच्छता, टापटिप, नीटनेटकेपणा ठेवण्याचे कार्य बुद्धिचे आहे. बुद्धीने श्रद्धेचे आसन मांडुन ठेवावे,पण आपणच त्यावर बसु नये. तिने सेवक म्हणुन मर्यादा सांभाळावी. श्रद्धेला-विश्वासाला साहाय्य करावे. त्यांना पदच्युत करु नये. तसे झाले तर सर्व मानवी जीवन अस्वास्थ्य, वैताग, विषण्णता यांनी भरुन जाते.

प.पू.ब्र.स्वामी वरदानंद भारती

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र आदि शंकराचार्य विरचित देवी अपराध क्षमापन स्तोत्र हे शरणागत भाव दर्शवणारे अत्यंत भावगर्भ आणि स...