Showing posts with label हिंदू धर्म समजून घ्या. Show all posts
Showing posts with label हिंदू धर्म समजून घ्या. Show all posts

Wednesday, 23 October 2019

एकश्लोकी गणेश स्तवन



|| आदि शंकराचार्य विरचित एकश्लोकी गणेश स्तवन ||



गलद्दानगंण्डं मिलद्भृङखंण्डं |
चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं ||
लसद्दंतकाण्डं विपद्भंङचण्डं |
शिवप्रेमपिण्डं भजेवक्रतुंण्डं ||


ज्याच्या गंडस्थलातून दानोदक स्त्रवत आहे, (दानोदक म्हणजे हत्तीच्या गंडस्थळातून पाझरणारा द्रव)
त्या दानोदकाच्या सुगंधाने आकृष्ट झालेले भ्रमरांचे समुदाय ज्याच्या गंडस्थलाभोवती गुंजारव करत आहेत,
ज्याची सुंदर सोंड इकडून तिकडे आणि तिकडून इकडे अशी सारखी हलते आहे, जो जगाचे संरक्षण
करण्यामध्ये कुशल आहे, सोंडेच्या दोन्ही बाजूंना ज्याचे दात शोभत आहेत, भक्तजनांच्या विघ्नांचा नाश
करण्यास जो पूर्ण समर्थ आहे व जो शंकराचे मूर्तिमंत प्रेमच आहे, त्या वक्रतुंडाला – श्रीगजाननाला मी
प्रेमाने भजतो आहे. वक्र म्हणजे वाकडे, दुष्ट प्रवृत्तीचे लोक, त्यांना तुंडयति म्हणजे तुडवितो, नष्ट करतो,
म्हणून गजाननाला वक्रतुंड म्हणतात. त्या वक्रतुंडाला मी नमन करतो.

शांतिपाठ निरूपण



 शांतिपाठ निरूपण 




असतो मा सद्गमयः
तमसो मा ज्योतिर्गमयः 
मृत्योर्मामृतं गमयः 
सर्वेपि सुखिनः सन्तु 
सर्वे सन्तु निरामयः 
सर्वे भद्राणि पश्यन्तु 
मा कश्चित दुखःभात्भ्वेत 
ॐ द्यौः शान्तिः अंतरीक्ष शान्तिः पृथ्वी शान्तिः 
आप शान्तिः रोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिः 
विश्वेदेवः शान्तिः ब्रह्मशान्तिः सर्व शान्तिः 
शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि 
ॐ शान्तिः  शान्तिः शान्तिः

यजुर्वेदातील हा शांती पाठ मंत्र रोज सांयंदीप प्रज्वलन करताना म्हणण्याचा प्रघात आहे. या मंत्राचा
भावार्थ फार सुंदर आहे. 
हे ईश्वरा प्रत्येक जीवात्म्याचा प्रवास हा असत अर्थात असत्याकडून सत्याकडे होऊ दे. जग हे
अशाश्वत आभासमय आहे या सत्याची जाणीव प्रत्येक जीवात्म्याला होऊ दे आणि सत्य आणि
शाश्वत अश्या ब्रह्मतत्वाला जाणण्याची त्याला बुद्धी होऊ दे.  

प्रत्येक जीवात्म्याचा अज्ञानरुपी अंधःकार दूर होऊन त्याला आत्मस्वरूपाची जाणीव होऊ दे.
आपल्या शरीराला तो स्वतःचे अस्तित्व मानतो आहे हे अज्ञान आहे. तो सच्चिदानंद चेतना स्वरूप
आत्मा आहे तो प्रकाशमय आहे हे त्याला उमजू दे. 

अज्ञान हे मृत्यूसमान आहे, मृत्यूकडे नेणारे आहे. ज्ञान शाश्वत आहे चिरकाल टिकणारे आहे.
अमर आहे. याची जाणीव होऊन जीवात्म्याचा प्रवास अज्ञानाकडून ज्ञानाकडे होऊ दे. 

सर्व जीव सुखी व्हावेत, निरोगी व्हावेत, सर्व जीवांचे कल्याण व्हावे या विश्वात दुक्खाचा सामना
करण्याची वेळ कुणावरही न येवो. 

हे परमात्म्या तू शांतीस्वरूप हो. अंतरीक्षा तू शांतीस्वरूप हो. पृथ्वी, जल , वायू, औषध, वनस्पती,
विश्व देव , सर्व देवता गण, ब्रह्म हे सर्व शांती स्वरूप होवो. सर्वत्र शांतता नांदो. चारही दिशांना
शांतता नांदो. परमपिता परमेश्वर शांतीरूप होवो. सर्वत्र केवळ शांती शांती आणि शांती असो. 

संपूर्ण विश्वाचे भले व्हावे हे चिंतणारा हा शांतीपाठ आपण कधीच आपल्या सायंप्रार्थनेतून हद्दपार
केला आहे. जे चिंती परा ते येई घरा अशी म्हण आहे. मग सर्व विश्वाचे भले चिंतणारा हा शांतीपाठ
आपण रोज म्हणू लागलो तर आपल्या घरात सुद्धा शांती नांदेल असा याचा सोपासा अर्थ आहे. 
  
एक छोटीशी पणती. घरात लावली जाणारी. सर्वत्र व्यापलेल्या अंधाराचा ठाव घेणारी. अंधःकारातील
भीतीवर मात करून जगण्याचे बळ देणारी. तिची ज्योत किती तेजस्वी आहे हा मुद्दाच नाही.
अंधाराच्या साम्राज्याला छेद देत अंतःकरणात प्रकाश जागृत करण्याचे काम ती पणती करते.
तिचे कार्य सूर्यापेक्षाही थोर आहे. 

म्हणून आपल्या संस्कृतीत पणती हे ज्ञानाचे, आत्मप्रकाशाचे प्रतिक मानली गेली आहे. अंधःकारमय
निराशाजनक आणि वाईट शक्तींच्या रूपाने व्यापलेल्या विश्वात जगण्याची प्रेरणा देणारी आणि
त्यांच्याशी झुंजण्याचे बळ देणारी पणती हि त्याच अग्नीचे लघुरूप आहे ज्याने मानवाला इतर
प्राण्यांच्या पासून भिन्नत्व प्रदान केले. 

शारीरिक दृष्ट्या दुर्बल असणारा असहाय्य असणारा मानव ज्ञानरुपी पणतीचा वापर करून आज
या पृथ्वीवरील श्रेष्ठ जीव झाला आहे त्या विजीगिषु वृत्तीचे प्रतिक पणती आहे. 

पणती एकटी आहे जसा जीवात्मा या विश्वात एकटा आहे. पणती थोर होईपर्यंत जगाला प्रकाश देत
राहाते. आत्मा शेवटच्या क्षणापर्यंत को अहं चा शोध घेत लढत राहातो. पणती हि मानवाच्या
प्राणशक्ती चे मूर्त रूपक आहे. 

देहली दीप या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. आपले शरीर हे बाह्य विश्व आणि आपला आत्मा हे
अंतर्विश्व. शरीर आणि आत्म्याच्या देहलीवरील उंबऱ्यावर आत्मज्ञानाचा दिवा प्रज्वलित करणे तो
देहली दीप. हा आत्मज्ञानाचा दीप सतत प्रज्वलित ठेवला तर आपण अंतर्बाह्य उजळून निघतो.
अंतरीचा ज्ञानदिवा करुया जागृत..

अंतर्बाह्य करुया प्रकाशित........... 

तत्वमसि ब्लॉग आणि मासिकाच्या माध्यमातून आम्ही हा ज्ञानदीप प्रज्वलित करतो आहोत. आपल्या
संस्कृतीतला सगळा सकारात्मक भाग आम्ही सर्वांच्या पर्यंत पोचवण्याचा या निमित्ताने प्रयत्न
करतो आहोत. आपल्या सक्रीय सहकार्याची अपेक्षा आहेच.. 

©सुजीत भोगले. 



कानडा ओ विठ्ठलू


|| कानडा ओ विठ्ठलू ||




संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वरांचा हा एक अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे. अद्वैताचे निरुपण करणारी ही
एक अत्यंत सुंदर रचना आहे. यात ज्ञानदेव त्यांच्या मनातील द्वैताद्वैत संघर्ष आणि विठ्ठलाच्या
प्रतिकात तो कसा व्यक्त होते याचे निरुपण करतात. उपासनेच्या पहिल्या पायरीवर असणाऱ्या
प्रत्येक साधकाच्या मनातील प्रतिबिंबच यातून दिसते आणि मग या रचनेचा खरा भावार्थ उलगडतो.
मुर्तीस्वरुपात ईश्वराला पाहून द्वैती उपासना करणाऱ्या प्रत्येक साधकाने त्यातील अद्वैत तत्व कसे
उलगडून पाहावे आणि त्याच्याशी कश्या पद्धतीने तादात्म्य पावावे याचा वस्तुपाठ ते घालून देत
आहेत.  हा या अभंगाचा मला वाटलेला अर्थ आहे. हे लिहायचे कित्येक महिने मनात होते परंतु
मी काढलेला हा अर्थ प्रचलित अर्थांच्या पेक्षा वेगळा आहे म्हणून थोडा बिचकत होतो.
अखेरीस हिंमत करून व्यक्त झालो आहे. याचे योग्य मुल्यमापन करा हि विनम्र विनंती. 

अभंग हा शब्दच ईश्वरी तत्वाशी जीवात्म्याचे असणारे एकरूपत्व सांगते. ईश्वर आणि साधक यांच्यात
काहीही द्वैत. भेद, भंग नाही हे सांगणारे काव्य म्हणजे अभंग. 

ही ईश्वराची कोरी स्तुती नाही. यातून ईश्वराच्या स्वरूपाचे, त्याच्या भव्यतेचे जसे सालंकृत वर्णन
आहे तसेच त्याच्याशी जीवात्मा रुपात असूनही आपण कसे एकरूप आहोत याचे हे मोठ्या
खुबीने सांगितलेले आहे. 

आपण एक उत्तम रचना, एक काव्य म्हणून अभंगाचा रसास्वाद घेतो. भक्तीगीत समजून ते
मुखोद्गत करतो. पण द्वैतभाव त्यागून अद्वैतानुभूतीचे हे एक साधन आहे या दृष्टीने त्याकडे
पाहात नाही. त्या पातळीवर जाऊन आपण या अभंगांचा अर्थ लावत नाही. या निरुपणाच्या निमित्ताने
मी तो दृष्टांत देण्याचा प्रयत्न करतो आहे. भागवत धर्मातील सर्व संत मंडळीनी या अद्वैताचा
घेतलेला स्वानुभव अभंगांच्या रूपात शब्दबद्ध केला. ज्याच्या केवळ भक्तिपूर्वक
श्रवणाने ईश्वर आणि आपल्यातील अद्वैताची आपल्याला जाणीव होईल. वेदांताला इतक्या
सोप्या,सुलभ शब्दात मांडून रचलेले हे काव्य श्रवण करून आपल्या चित्तात आपण
अद्वैतभाव जागृत केला पाहिजे. शब्दांच्या बुडबुड्यात न अडकता त्यातील गुह्य तत्व
समजून घेतले पाहिजे. आपल्या भाबड्या निरागस भक्तीला ज्ञानाचे लेपन केले पाहिजे.  

पहिल्यांदा आपण पांडुरंग विठ्ठलाच्या मूळ स्वरूपाला समजून घेऊ. पांडुरंग विठ्ठल हा
हरिहरेश्वराचे रूप आहे. अर्थात शिवतत्व आणि विष्णू तत्व ( श्रीकृष्ण स्वरूपातील ) यांचे एकरूप,
अभिन्न स्वरूप म्हणजे विठ्ठल. सृष्टीच्या रचनेत आदिमायेने जी कार्ये प्रत्येक देवाला दिलेली आहेत
त्यात ब्रह्मदेव हा निर्मितीचे कार्य करतो. विष्णू या सृष्टीचे लालन पालन करतो. सृष्टीचे संवर्धन
आणि सृष्टीचक्र अव्याहत चालू राहण्यासाठी कार्यरत असणारा देव म्हणजे विष्णू. शिव हा
मूर्तिमंत वैराग्याचे, संहाराचे प्रतिक आहे. या सृष्टीक्रमात प्रत्येक जीवाला कालवश करून
मृत्युरुपाची ओळख करून देणारा महादेव म्हणजे शिव. सृष्टीच्या अंताला या संपूर्ण विश्वाचा
संहार करून त्याचे भस्म शरीराला लेपित करणारा शिव हा उग्र देव आहे.

अर्थात या संहारात, विनाशातच नवनिर्मितीची बीजे असतात. जीवात्मा कर्मफलांचा भोग घेण्यासाठी
परत नवीन शरीर मृत्युनंतर धारण करू शकतो. या जन्ममरणाच्या फेर्यात अडकलेला असतानाच
वैराग्य जागृत करून घेऊन ब्रह्मतत्वाशी तादात्म्य पावण्यची इच्छा निर्माण करवणारा ईश्वर हा
महादेव शिव आहे. अर्थात वरवर शिव आणि विष्णू या दोन देवांची कार्ये परस्पर विरुद्ध वाटत
असली तरी ती परस्पर पूरक आहेत. विष्णू रूपातील ईश्वराची उपासना जीवात्म्याला
प्रापंचिक जबाबदाऱ्या परिपक्वपणे सांभाळण्यास शिकवते आणि शिव स्वरूपातील
ईश्वराची उपासना जीवात्म्याला प्रापंचिक जबाबदारी पालन करताना कृतार्थ आणि तृप्त
होऊन वैराग्य जागृत करण्यास आणि त्यातून आत्मिक प्रगती साधण्यास प्रेरित करत असते.
हरीहरेश्वराने हे रूप पुंडलिकाला वरदान देण्यासाठी धारण केले आहे. हे वरदायिनी रूप
हे तमाम भक्तांच्या साठी पंढरपुरात अवतरले आहे. असा हा पांडुरंग विठ्ठल ही भागवत
धर्माची मुख्य उपास्य देवता आहे. हरिहरेश्वराचे हे एकस्वरूप वारकरी भजतात ते
याचसाठी कि प्रापंचिक अडचणीतून ईश्वराच्या नामस्मरणास वेळ मिळावा. नामस्मरणातून
अध्यात्मिक प्रगती व्हावी. कर्म श्लेष नष्ट व्हावा. नामस्मरण करत भवसागर तरून जाता यावा
आणि जन्म मृत्युच्या फेऱ्यातून कायमची सुटका व्हावी. 

या अभंगात ज्ञानदेव पंढरपुरी विठ्ठलाच्या दर्शनाला प्रथम गेले तो अनुभव कथन करत आहेत.

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती | रत्नकीळ फाकती प्रभा ||
अगणित लावण्य तेजः पुंजाळले | न वर्णवे तेथींची शोभा || ||


सायंकाळी गुरे वनात चरून ज्यावेळी गावात परत येतात त्यावेळी त्यांच्या पायांच्या मुळे उडणारी
धूळ ज्या रंगाची असते तो श्वेत राखाडी रंग म्हणजे पांडुरंग. विठ्ठलाची कांती अशी पांडुरंगाची आहे
जो दिसण्यास अत्यंत सुंदर, लावण्यरूप आहे. तो आत्मस्वरूपाच्या तेजाने झळाळतो आहे. या
तेजस्वरूप ईश्वराच्या मस्तकावर असणारा मुकुट आणि अंगावरील दागिने रत्नांचे आहेत. विठ्ठलाच्या
मुखावरील आभा या रत्नांवर पडते आहे आणि ती परावर्तीत होऊन हि रत्नप्रभा सर्वत्र पसरली आहे.
एकंदर विठ्ठलाचे हे दृश्य रूप अत्यंत विलोभनीय आणि अवर्णनीय आहे. लावण्यस्वरूप तेजस्वी
असे हे विठ्ठलाचे स्वरूप पाहून ज्ञानदेव स्तंभित झाले.

या कडव्याचा अजून एक भिन्न अर्थ गवसला. तो सुद्धा इथे मांडतो आहे. 

अनादी परब्रह्माला सत मानले जाते. त्याचे अक्षर प आहे. हे परब्रह्म निरपेक्ष, अक्षर, अव्यय,
अनिवर्चनिय आहे. हे परब्रह्म एकटे होते. त्याच्याशिवाय सृष्टी मध्ये काहीही नव्हते. या ब्रह्माने
ज्ञानमय तप केले. त्याच्या ज्ञानमय स्वरूपावर एक तमोगुण रुपी शक्तीचे आवरण निर्माण झाले.
या आवरणाने  श्लिष्ट झालेलं ते ब्रह्मतत्व जगताच्या उद्भवाची इच्छा करते. हि इच्छा किंवा
संकल्पात्मक कार्य म्हणजे मन. मनाच्या या तेजोमय संकल्पातून असतचा जन्म होतो. 

या संकल्पातून  अहं या स्व स्वरूपाचे भान येणे हे सत  आणि त्या संकल्पाचे कार्य कामरुपात्मिक
सृष्टीचे निर्माण हे असत आहे.या अवस्थेत निर्माण झालेला भाव म्हणजे एकोहम बहुस्यामी. या
अवस्थेत शिव तत्व निर्गुण, शुद्ध ब्रह्म रूप आहे आणि त्यावर शक्ती अव्यक्त स्वरूप
आवरणमात्र आहे. शुद्ध भ्रमस्वरूप आकाशात पहिले स्पंद निर्माण होऊन या स्पन्दाचे धुरकट
आवरण ब्रह्मतत्व शिवावर निर्माण झाले आहे. या आवरणात सुद्धा ब्रह्माचा तेजोमय प्रकाश
चमकतो आहे. हा तेजोमय प्रकाश हिरण्यवर्णी अर्थात सोन्यासारखा आहे. 

हा विश्व उत्पत्तीचा पहिला क्षण आहे. 

पांडुरंगाला पाहता क्षणी ज्ञानदेवांना त्या क्षणाची अनुभूती येते. यात असत आवरण जे असते ते
धुरकट असते हा धुरकट वर्ण म्हणजे प रुपी सत्यावरील पांडुरंग अर्थात आवरण आहे.
त्याच्यावरील सोनसळी पितांबर म्हणजे हिरण्यगर्भ रूप आहे. 

पांडुरंग विठ्ठलाच्या या रूपाचे अगदी असेच वर्णन आदि शंकराचार्य सुद्धा करतात. 

 महायोगपीठे तटे भीमरथ्या
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥१॥ 


पंढरी या महायोगपिठात भीमा नदीच्या तीरावर पुंडरीक या भक्ताला वर देण्यासाठी वाट
पहात उभा राहिलेले आनंदकंद स्वरूप परब्रह्मलिंग म्हणजेच पांडुरंग आहे. 


कानडा हो विठ्ठलू कर्नाटकु | तेणें मज लावियला वेधू ||
खोळ बुंथी घेउनी खुणाचीये पालवी | आळविल्या नेति सादू || ||


ईश्वराच्या मूळ स्वरुपाला जाणून घेताना उपनिषदात त्याच्या निर्गुणतेचे वर्णन नेती नेती स्वरूपात
केले आहे. तो हा हि नाही आणि तो तो हि नाही. हे स्वरूप सर्व गुणांच्या पलीकडे किंवा सर्व गुणांना
व्यापूनही त्या पेक्षा अधिक असे आहे हे सांगताना हा नेती नेती सिद्धांत आळवला गेला आहे.
निर्गुण निराकार आणि तरीही सर्वस्व व्यापून दशांगुळे उरलेल्या या ईश्वरी अस्तित्वाचा ठाव घेण्याचा
उपनिषदात प्रयत्न केला गेला. ज्ञानाच्या मार्गाने ईश्वराचे हे स्वरूप ओळखण्याचा प्रयत्न करणारे
सगळेच तिथे थकले. इथे ज्ञानदेव ज्ञानियांच्या मार्गाची मर्यादा व्यक्त करत आहेत. नेती नेती ची
साद देऊनही त्याचे गूढ उकलत नाही. तो जणू इथे मूर्ती स्वरुपाची खोळ पांघरून बसलेला
आहे आणि मला खुणावतो आहे. त्याच्या खुणांचा अर्थ मला उमगत नाही. माझ्या समोर
दिसणारा हा विठ्ठल कानडा आहे. ( कानडा : समजून घेण्यास अत्यंत कठीण ). त्याची तेजः पुंज,
रत्नांचा शृंगार ल्यालेली मूर्ती हे त्याचे स्वरूप नाही तर हि त्याची लीला आहे. ( कर्नाटकू : नाट्य,
लीला दाखवणारा ). जणू मला तो जरी हे दृश्य स्वरूप दाखवत असला तरी मला तो याच्या
पलीकडे पाहण्यास, याच्या पलीकडे मला जाणून घेण्यास खुणावतो आहे. पण त्याच वेळी
या मुर्तीस्वरूप दर्शनाच्या या लीलेने आपल्या मनाचा वेध घेतला आहे याची त्यांना जाणीव झाली.
या पुढे जाणून तर घ्यायचे आहे पण त्याच्या सौंदर्याने आपण बद्ध झालो आहोत हे सुद्धा जाणवते
आहे मनाच्या अश्या विचित्र अवस्थेत ते पोचले आहेत. विचारांच्या मार्गाने, तर्काच्या मार्गाने हे
स्वरूप जाणून घ्यावे तर बुद्धी आणि मन या सौंदर्यरुपात अडकून पडले आहे.

शब्देवीण संवादू दुजेवीण अनुवादू | होई तव कैसे निगमे ||
परी ही परते बोलणे खुंटले | वैखरी कैसेनि सांगे || ||


वाणी चे चार स्तर आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपण दैनंदिन जीवनात वैखरी
वाणीने संवाद साधत असतो. मध्यमा वाणी म्हणजे विचारपूर्वक बोलणे हि वाणी वैखरी पेक्षा अधिक
प्रभावी असते. पश्यंती वाणी म्हणजे वाचासिद्धी प्राप्त पुरुषाची वाणी. या वाणीने दिलेला
आशीर्वाद अथवा शाप तत्काळ फलित होतो. अत्यंत प्रभावी वाणी. परा वाणी तुम्हाला थेट ईश्वरत्व
प्रदान करते. अष्ट सिद्धींच्या पैकी इशिता सिद्धी प्राप्त पुरुषाला हि वाणी वश होते. या वाणीने
संवाद साधणारा पुरुष हा सतत मनाच्या शून्य अवस्थेत असतो. त्याचे मन निर्विचार आणि निर्विकार
असते. 

इथे ज्ञानदेव सांगतात कि वैखरी वाणीत संवाद करण्याची कला अवगत असणारा व्यक्ती ( अर्थात
सामान्य मानव ) म्हणून मी या स्तंभित अवस्थेत विठ्ठलाशी संवाद साधायचा प्रयत्न सुरु केला.
त्यावेळी असा चमत्कार घडला कि माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते पण माझा विठ्ठलाशी
थेट संवाद होऊ शकत होता. मी प्राकृत भाषेत प्रश्न विचारत होतो त्याचे उत्तर विठ्ठल देववाणी
संस्कृत मध्ये देत होता पण मला जणू ते आपोआप अनुवादित होऊन प्राकृतात उमजत
होते. शब्दांच्या माध्यमातून बोलण्याची प्रक्रिया पूर्णपणे खुंटली. कारण विठ्ठल माझ्याशी परा
वाणीने संवाद साधत होता आणि त्याने क्षणात मला सुद्धा परा वाणीने संवाद साधायच्या पातळीवर
आणून ठेवले.

परा वाणी ने साधलेला संवाद म्हणजे मनाला शून्य अवस्थेत नेऊन ठेवणे. चित्त आपल्या
मनातील प्रश्नावर, विचारावर स्थिर करणे आणि त्या प्रश्नाचे , विचाराचे चिंतन करणे. या चिंतनात
निमग्न असताना आपल्या अंतरात्म्यातून त्या प्रश्नाचे उत्तर प्रकट होते. ते आपल्या आतूनच प्रकट
होते परंतु ते आपल्या विचारांच्या मर्यादेच्या पलीकडचे अत्यंत उद्दात असे असते. जणू ते
आपला अंतरात्मा आपल्याला सांगत नसून कोणी ईश्वरी शक्ती आपल्याशी संवाद साधून ते
आपल्याला ऐकवते आहे. अश्या पद्धतीने चिंतनातून मिळालेले विचारधन म्हणजे वेद. वेदांना
श्रुती त्या अर्थाने म्हटले गेले आहे. कि ते अव्यक्त अवस्थेत व्यक्त झाले प्रकट झाले. वेदांचा
उल्लेख निगम म्हणून केला जातो. ( आगम म्हणजे तंत्र आणि निगम म्हणजे श्रुती ग्रंथ यात केवळ
वेद नाही तर उपनिषदे आणि दर्शनशास्त्रे सुद्धा येतात ).
ज्ञानेश्वर अश्या स्तंभित असलेल्या अवस्थेत असताना विठ्ठल त्यांच्याशी परा वाणी ने संवाद साधतो
आणि त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देतो. ( किंवा याचा अर्थ चारीही वेद आणि तमाम
श्रुतींचे ज्ञान विठ्ठल ज्ञानदेवांना त्यावेळी परा वाणी ने काही क्षणात प्रदान करतो असा सुद्धा होऊ
शकतो.) जे ज्ञान मनाच्या शून्य अवस्थेत मिळाले आहे आणि जे सतत त्या अवस्थेत राहूनच उमगू
शकते त्याला मी शब्दबद्ध कसा करू आणि ते मी सामान्यांना समजेल असे कसे काय सांगू ?
हा प्रश्न त्यांना पडतो.

पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे| उभाची स्वयंभू असे ||
समोर की पाठीमोरा न कळे | ठकची पडिले कैसे ||||


विठ्ठलाने मनातील प्रश्नांची उत्तरे तर दिली परंतु ती शब्दात मांडणे आणि त्या संवादाला सुद्धा
शब्दबद्ध करणे अशक्य आहे याची ज्ञानेश्वरांना जाणीव होते. मग ते विठ्ठलाच्या या स्वरुपाची
भक्ती मार्गाने उपासना करून त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु भक्तीच्या
या मार्गाने ज्ञानेश्वरांनी आपल्याकडे यावे हेच पांडूरंगाला मान्य नाही म्हणून तो त्याची लीला
( नाट्य ) परत एकदा दाखवतो. सामान्य भक्ताच्या प्रमाणे ज्ञानदेव विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाया
पडायला जातात तर त्यांना तो स्वयंभू उभा दिसतो. स्वयंभू उभ्या पांडुरंगाचे पायच दिसत
नाहीत त्यामुळे पाया पडणे शक्य नाही. त्याचे शरीर सुद्धा आता असे दिसू लागते कि
आपण त्याला समोरून पाहतो आहे कि पाठीमागून हे सुद्धा कळणे त्यांना अशक्य होऊन
बसते. आपल्याला पारंपारिक पद्धतीने पाया पडून पांडुरंगाचे दर्शन घेता येत नाही त्यामुळे
आपण जणू फसवले गेलो आहोत असे ज्ञानदेवांना वाटते परंतु हि सुद्धा त्याचीच लीला
आहे आणि तो जणू आपल्याला या उपासनेच्या मार्गाचे न्यूनत्व किंवा मर्यादेची जाणीव करून
देतो आहे हे त्यांच्या ध्यानात येते. निर्गुण निराकार आणि सर्वव्यापी अश्या ईश्वराला सगुण साकार
करताना आपण त्या रुपात बद्ध करतो. आणि हात पाय असे मानवी अवयव लावून त्याची मानवी
दृष्टीने उपासना सुरु करतो. परंतु ईश्वराच्या सर्व व्यापकतेच्या तुलनेत हि उपासना अत्यंत
तोकडी आहे किंवा ईश्वराच्या स्वरूपाला न समजून घेता आपण त्याच्यावर जे मानवी मेंदूच्या
कक्षेच्या कोंदणात त्याला बसवण्याचा प्रयत्न करतो तो किती तोकडा आहे याची जाणीवच जणू
पांडुरंग ज्ञानदेवांना आणि त्यांच्या रूपाने सर्व सामान्यांना करून देतो.

क्षेमा लागी जीवा उतावीळ मन | म्हणवूनी स्फुरताती बाहू ||
क्षेम देऊ गेले परी मी ची मी हि एकली | आसावला जीव राहो ||||


आता ज्ञानेश्वर पांडुरंग रूपातील श्रीकृष्णाला एक प्रेयसी ( राधा स्वरूप ) होऊन त्याच्याशी
तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करतात. एक प्रेयसी आपल्या प्रियकराला पाहून ज्या प्रमाणे प्रेम
व्याकूळ होईल तिचे बहु स्फुरण पावतील आणि ती मिठी मारेल ( मिठीत घेण्याचा प्रयत्न करेल )
त्या प्रमाणे ते विठ्ठलाला कवटाळतात. परंतु मिठी मारल्यावर त्यांच्या लक्षात येते कि ती एकटीच
आहे आणि तिचा जीव प्रियकराला मिठीत घेण्यासाठी आसुसलेलाच राहतो. इथे ज्ञानदेव स्वतःचा
उल्लेख स्त्री म्हणून करतात ( कृष्ण सखी राधे सारखा ) तर या मागे एक खूप सुंदर सिद्धांत
आहे. आणि तो आचार्य आदि शंकराचार्य यांनी सौंदर्यलहरी मध्ये मांडला आहे तो इथे
सांगतो म्हणजे या कडव्याचा खरा अर्थ उमगेल. 

सौंदर्य लहरीतील श्लोक : 

त्वदीयं सौंदर्यं तुहीनगीरीकन्ये तुलयितुं 
कविन्द्रः कल्पन्ते कथमपि विरीन्चिः प्रभूतयः 
यदालौकुत्सक्यादमरललना यान्ति मनसा
तपोर्भिःदृष्प्राप्यामपि गिरीश सायुज्य पदवीम 


हे हिमालय पुत्री ( पार्वती ) तुझ्या सौंदर्याची तुलना करण्यासाठी तिचे वर्णन करण्यासाठी
ब्रह्मदेवांच्या सारख्या सिद्ध कवींची प्रतिभा सुद्धा अपुरी पडते इतकी तू सुंदर आहेस. तुझे हे
सौंदर्य पाहून अमर ललना म्हणजे देव पत्नी यांच्या मनात सुद्धा तुझ्या सौंदर्याच्या पूर्ण स्वरूपाचा
रसास्वाद घ्यावा हि इच्छा निर्माण होते. आता या इछेची पूर्तता त्या कशी करू शकतील ? तर त्या
अत्यंत दृष्प्राप्य अशी तपःसाधना सुरु करतात जेणे करून त्यांना सायुज्य मुक्ती मिळू शकेल
आणि सायुज्य मुक्ती मिळवताना त्या शिवस्वरूप अर्थात गिरीश समान होऊ शकतील. म्हणजे
त्या सायुज्य मुक्ती मिळवून शिव तत्वाचाच एक भाग होतील आणि त्या नंतर त्यांना तुझे हे सौंदर्य
परिपूर्ण रुपात अनुभवता येईल. अर्थात पार्वतीच्या सौंदर्याचा पूर्ण रसास्वाद घ्यायचा असेल तर
शिव स्वरूप होऊनच पार्वतीला प्राप्त करून घेणे शक्य आहे. 

याच न्यायाने पांडुरंग स्वरूपातील श्रीकृष्णाच्या पूर्ण स्वरूपाला जाणून घ्यायचे असेल या
लीलांच्या पलीकडे असलेल्या त्याच्या स्वरूपाला पूर्ण प्राप्त करायचे असेल तर आपल्याला राधा
स्वरूप ( श्रीकृष्णाची प्रेयसी ) होऊनच हे साधेल म्हणून ज्ञानेश्वर राधेस्वरूप होऊन पांडुरंगाला
मिठी मारतात परंतु त्या मिठीत सुद्धा त्यांना तो गवसत नाही आणि त्यांच्या हृदयातील आस अपुरीच
राहते.

बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणुनी
अनुभव सौरसु केला दृष्टीचा डोळा पाहू देखियले || 
तव भीतरू पालटू झाला..||||


आपल्या उपासना पद्धतीमध्ये भक्तीचे ९ मार्ग सांगितले आहेत. त्याला नवविधा भक्ती असे
म्हणतात. ज्ञानेश्वर इथे प्रत्येक मार्गाने पांडुरंगाला वश करण्याचा प्रयत्न करतात आणि तो
प्रत्येक मार्गाचे न्यूनत्व मर्यादा दाखवत त्यांच्याशी खेळ खेळतो. मग शेवटी ज्ञानदेव
पांडुरंग विठ्ठलाला पित्यास्वरूप समजून आणि रखुमा देवीला मातृसमान मानून हृदयात
स्थिर स्थान प्रदान करतात. आणि मग आत्मज्ञानाच्या मार्गाने सिद्ध दृष्टीने ते त्याचे स्वरूप
जाणून घेण्याचा प्रयत्न करतात ... तव भीतरी पालटू झाला...काय पालटू झाला तर हे लक्षात
ले कि पांडुरंग विठ्ठल आणि मी यात द्वैत नाहीच आहे. मीच अंशात्मक ब्रह्म, अंशात्मक
या पांडुरंग विठ्ठलाचे स्वरूप आहे. 

जर माझ्या आत पांडुरंग विठ्ठल हाच आत्मा म्हणून आहे. तर मग त्याच्या शारीरिक दर्शनाने
माझी भूक कशी भागेल. त्याचे शारीरिक सौंदर्य कितीही मोहक असले तरी ते मला अपुरेच वाटणार
आहे. कारण मला माझ्याच मूळ विराट स्वरुपाची एकदा जाणीव झाली आणि त्या विराट रूपाचा
मी अंश आहे हा विचार माझ्या आत्म्याच्या जोडीला माझ्या मनात सुद्धा स्थिर होईल त्या क्षणी मग
माझा बघायचा दृष्टीकोन बदलेल. मग हे लावण्यस्वरुप हि माझ्याच जीवात्म्याची प्रतिमा आहे हे
माझ्या ध्यानात येईल मग या दृश्य सौंदर्याच्या उपासनेची मर्यादा माझ्या लक्षात येईल आणि मी
या दृश्य भौतिक रूपाच्या उपासनेच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. परब्रह्म पांडुरंगाचे पूर्ण रूप हे
निर्गुण, निराकार आहे मग सगुण साकाराचे त्यावर केलेले हे लेपन प्राथमिक उपासनेसाठी योग्य
असले तरी त्या सगुण साकार रूपातच अडकून पडणे आणि त्या सगुण साकाराचीच सतत
उपासना करणे हे प्रगती थांबवणारे आहे. हे लक्षात घेऊन सगुण साकार उपासनेच्या पुढे
सरकण्यासाठी प्रेरित करायचे कार्य हा पांडुरंग करतो आहे. पांडुरंगाचे हे सर्व व्यापक स्वरूप
हे प्रियकर, मित्र अथवा पालक या कोणत्याही स्वरूपात आपण पाहू शकतो अनुभवू शकतो आणि
उपासना सुद्धा करू शकतो. अर्थात हा उपासनेचा प्राथमिक टप्पाच आहे पुढे जाऊन त्याच्या
अद्वैत रुपाची जाणीव करून घेणे आणि त्याच्याशी तादात्म्य पावणे हेच प्रत्येक भाविकाचे
( जीवात्म्याचे ) कर्तव्य आहे.

अद्वैताचा हा विचार सांगताना ज्ञानदेव या अभंगात पांडुरंगाच्या भेटीचे आणि सामान्य भक्त म्हणून
त्यांची तारांबळ उडते त्याचे वर्णन करतात आणि हे नाट्य घडवणारा विठ्ठल त्यांना आत्मनिवेदन
भक्ती मध्ये स्थिर कसा करतो त्याचे सुद्धा वर्णन करतात. अर्थात यातून एक सामान्य भक्त म्हणून
सुद्धा आपले मन हे नेहमीच अद्वैत उपासनेत स्थिर करणे हेच इष्ट आहे हे आपल्याला समजावून
सांगतात.

हा थोडासा वेगळा अर्थ मी या अभंगावर चिंतन करून काढला आहे. कदाचित तो चुकीचा
असू शकेल किंवा त्यात सुधारणा करायला लागेल.. तज्ञ मित्रांनी यावर मार्गदर्शन करावे आणि
या निरूपणाचे मूल्यमापन करावे हीच विनंती.


© सुजीत भोगले.

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र आदि शंकराचार्य विरचित देवी अपराध क्षमापन स्तोत्र हे शरणागत भाव दर्शवणारे अत्यंत भावगर्भ आणि स...