Sunday 8 December 2019

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र


सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र


आदि शंकराचार्य विरचित देवी अपराध क्षमापन स्तोत्र हे शरणागत भाव दर्शवणारे अत्यंत भावगर्भ
आणि सुंदर काव्य आहे. दुर्गासप्तशती पठन करणारे साधक पाठ संपला की याचे आवर्जून पठन
करतात. कारण ते देवीच्या रौद्र रूपाचे वर्णन आहे आणि पाठ करताना काही चूक झाली असेल तरी
देवीचा कोप होऊ नाही म्हणून याचे पठन करतात.. 

मातृभक्त आदि शंकराचार्य विरचित आईची केलेली आळवणी इथे देतो आहे.. 

न मन्त्रं नो यन्त्रं तदापि च न जाने स्तुतिमहो

न चाह्वानं ध्यानं तदापि च न जाने स्तुतिकथाः ।

न जाने मुद्रास्ते तदापि च न जाने विलपनं

परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ॥ १ ॥

जगन्माते, मला तुझ्या साठी रचले गेलेले मंत्र माहित नाहीत. त्यांचे पठन कसे करावे याचे सुद्धा ज्ञान
नाही. तुझ्या उपासनेसाठी वापरली जाणारी विविध यंत्रे आणि त्यांच्या पूजा पध्दती याची मला
काहीही कल्पना नाही. तुझी स्तुती करून तुला प्रसन्न करून घ्यावे ही बुद्धी सुद्धा मला नाही.
आवाहन करून तुला बोलवावे, तुझे ध्यान कसे करावे आणि ध्यानातून तुझ्याशी कसे एकरूप व्हावे
या बद्दल मला काहीच ज्ञान नाही. तुझ्या कर्तुत्वाच्या स्तुतीप्रद कथा मला माहित नाही. विविध मुद्रांच्या
द्वारे साधक तुझ्याचरणी लीन होतात त्या मुद्रांच्या बद्दल मला काहीही माहित नाही. शरणागत भाव
चित्ती आणून जे तुझी करुणा भाकतात ज्यामुळे तू त्यांना प्रसन्न होशील, तसा विलाप सुद्धा
करण्यात मला  काहीही स्वारस्य नाही. पण मला एक गोष्ट नक्की माहित आहे की मी तुझ्या
मार्गावर चाललो, तुझ्या सहवासात राहिलो की माझे क्लेश, दैन्य, दुक्ख नक्कीच नष्ट होते. 

विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया

विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत् ।

तदेतत्क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे

कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥ २ ॥

तुझी पूजा कशी करायची याची निश्चित माहिती नसल्याने, तुझी पूजा करण्यासाठी लागणारी
सामुग्री विकत घेण्याइतपत आर्थिक परिस्थिती नसल्याने आणि माझ्या अंगी आळस पुरेपूर
भरला असल्या कारणाने आजवर मला तुझी उपासना करणे शक्य झाले नाही. यामुळे मी तुझ्या
कृपाळू चरणांना अंतरलो. परंतु तरीसुद्धा तू मात्र तुझी कृपादृष्टी सतत माझ्यावर ठेव कारण हे
कल्याणमयी माते कुपुत्र जन्माला येऊ शकतो परंतु कुमाता कधीही असू शकत नाही. 


पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः

परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः ।

मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे

कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवति ॥ ३॥


जगन्माते या जगातील सगळे स्त्रीपुरुष ही तुझीच संताने आहेत. ते सगळे बिचारे अत्यंत सरळ
आणि पापभिरू वृत्तीचे आहेत त्यांच्यात मी एकच अत्यंत वेगळा असा अतिचंचल स्वभावाचा आहे.
परंतु मी खूप चंचल आहे म्हणून तू काही माझा त्याग करू नकोस कारण कुपुत्र जन्माला येऊ शकतो
परंतु कुमाता कधीही असू शकत नाही. 
 
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता

न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया ।

तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे

कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥ ४ ॥
इतर साधक किंवा उपासक जसे तुझ्या चरणी सतत लीन राहतात तुझी नित्य उपासना करतात.
नित्यकर्मे आणि कर्मकांड रुपी उपासनेची सेवा ते तुझ्या चरणांची सतत करत राहतात. काही साधक
यथाशक्ती यथामती तुझ्या साठी द्रव्यदान करत राहतात. दानरुपी सेवा करतात. मी यापैकी काहीही
केले नाही. परंतु तरी सुद्धा तू मला अंतरली नाहीस, तुझी माझ्यावरील कृपादृष्टी कमी झाली नाही.
इतकेच काय तुझ्या मायेचा वर्षाव माझ्यावर सतत चालू असतो. कारण कुपुत्र जन्माला येऊ शकतो
परंतु कुमाता कधीही असू शकत नाही. 


परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया

मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि ।

इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता

निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ॥ ५ ॥
मी आजवरच्या आयुष्यात विविध देवांची देवतांची उपासना केली. ज्या ज्या वेळी ज्या देवाची
उपासना करण्याची बुद्धी झाली त्या वेळी त्या त्या देवाची उपासना केली. असे करत करत मी
आयुष्याच्या ८५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. ही सगळी पूजा उपासना व्यर्थ होती याची आज मला
जाणीव होते आहे. कारण या सर्व देवी देवतांच्या उपासनेने मला हवे असणारे काहीही मिळू शकले
नाही. तुझ्या उपासनेशिवाय मला तरणोपाय नाही आणि माझ्या इच्छापुर्तींची ताकद फक्त तुझ्यात
आहे याची जाणीव मला आज झालेली आहे. आता या परिस्थितीत जर तू माझ्यावर कृपा दृष्टी वळवली
नाहीस तर लंबोदर गजाननाच्या माते तूच मला सांग मी कुणाला शरण जाऊ ? 

( याचा एक गूढ अर्थ आहे. ८५ व्या वर्षी म्हणजे मानवाने केलेला ८४ लक्ष योनीतील प्रवास. तो पूर्ण
करून त्या नंतरच एक जन्म अर्थात मानव जन्म प्राप्त झाला आहे. कुलदेवता, कुलस्वामिनी ही नेहमीच
आदिमाया भवानीचेच रूप असते. आपण ज्या कुळात जन्म घेतो तो निरर्थक नसतो. त्या कुलाच्या
कुलदेवतेची सेवा या जन्मात आपल्या हातून होणे अभिप्रेत असते. ते आपल्या जीवात्म्याच्या प्रगतीसाठी
आवश्यक असते. हे समजून न घेता लोक इतर कोणत्यातरी देवाला, गुरूला शरण जातात
आणि त्यांच्या कर्मकांडात संपूर्ण आयुष्य वाया घालवतात. तुमचा इष्टदेव तुमची कुलस्वामिनीच
असते. आई पेक्षा मुलाचे भले व्हावे असे इतर कुणालाही कधीच वाटत नाही. लंबोदर गणेश हा उल्लेख
सुद्धा त्याच अर्थाने आहे. लंबोदर असणे हा जणू दुर्गुण आहे. पण तरीसुद्धा गणेश त्याच्या आई पार्वतीला
अत्यंत प्रिय आहे. ती त्याच्या लंबोदर असण्याचा विचार सुद्धा करत नाही. तसेच मी इतर गौण देवी
देवतांची उपासना केली हा माझा दुर्गुण माते तू सुद्धा लक्षात घेऊ नकोस. कुलदेवतेची उपासना सर्वश्रेष्ठ
आहे हा या श्लोकाचा भावार्थ आहे. )


श्र्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा

निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः ।

तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं

जनःको जानीते जनानि जपनीयं जपविधौ ॥ ६ ॥
ज्या व्यक्तीच्या कानावर तुझे नुसते मंत्रोच्चार पडतात. तो व्यक्ती जलप्राशन करण्याच्या सुद्धा
लायकीचा नसेल अर्थात अत्यंत निष्कांचन असेल तो मध प्राशन करू लागतो. दारिद्र्याने पिचलेला
गरीब माणूस कोट्याधीश होतो. या अशक्य अप्राप्य गोष्टी सामान्य मानवांना साधतात. हे केवळ मंत्रोच्चार
ऐकण्याचे फळ आहे. या गोष्टींची कल्पना सुद्धा करणे अशक्य आहे की सामान्यांचे भाग्य कसे उजळेल
जर ते जप तपासह तुझी दीर्घ उपासना करतील. 


चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो

जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः ।

कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं

भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम् ॥ ७ ॥
ज्याने सर्वांगाला स्मशानातील चितेचे भस्म विलेपन केले आहे. जो अन्न समजून विष भक्षण करतो.
जो दिगंबर आहे अर्थात दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे असा अवधूत आहे. ज्याच्या केसांच्या जटा
झालेल्या आहेत. ज्याने गळ्यात सापांची माळ घातलेली आहे. जो बैलावर बसून फिरतो अर्थात ज्याचे
वाहन वृषभ आहे अश्या सर्व दृष्ट्या निर्गुणाच्या कपाळावर जगदीश ही विश्वातील सर्वश्रेष्ठ पदवी आहे.
कारण त्याची पात्रता एकच आहे की त्याने तुझे पाणिग्रहण केलेले आहे. अर्थात तू त्याचा हात धरून
त्याची पत्नी झालीस आणि अश्या निर्गुणाचे भाग्य उजळले. लोक त्याला जगदीश विश्वनाथ समजून त्याची
पूजा करू लागले. 
( याला व्याजोक्ती असा अलंकार म्हणतात. एखाद्याच्या गुणांचे वर्णन करण्यासाठी त्याच्या गुणांचाच
उल्लेख उपहास स्वरूप केला जातो. परंतु त्यातून मूलतः त्या व्यक्तीच्या गुणांचेच कौतुक असते.
ज्यांना समजेल त्यांच्यासाठी.. ) 


न मोक्षस्याकाङ्क्षा भवविभववाञ्छापि च न मे

न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः ।

अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै

मृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ॥ ८ ॥

हे चंद्रमुखी माते मला मोक्ष नको आहे जो सर्व ज्ञानियांची इच्छा असते. मला विज्ञान आणि 
प्रापंचिक जगातील भौतिक सुखांना जाणून घेणे अथवा त्यांचा उपभोग घेणे या पैकी एकही
अभिलाषा उरलेली नाही. आता मला तू एकच इच्छापूर्तीचा वर दे माझे उर्वरित आयुष्य मृडानी, रुद्राणी,
शिव, शिव भवानी असा अजप करण्यात व्यतीत होऊ दे. ( सर्वार्थाने नामात लीन होण्याची इच्छा
व्यक्त करणारा हा भाव वास्तवात उपासनेच्या अत्यंत सोप्या परंतु अत्यंत प्रभावी पद्धतीचे महत्व
सांगत आहे. की केवळ नामस्मरण करत सुद्धा मला न मागता सुद्धा सर्व भौतिक आणि आधिभौतिक
सुखे वश होऊ शकतात आणि त्यांचा उपभोग घेणे वा न घेणे हा माझा निर्णय असेल आणि मी मात्र
कामना हीच करतो आहे की हा भोग सुद्धा नामस्मरणात लीन राहून मी करेन जेणेकरून हे वैभव
चिरंतन राहील. ज्ञानियांच्या मार्गाने जाण्यापेक्षा केवळ नामस्मरण करूनही इतकी मोठी प्रगती साधता
येते हे हा श्लोक सांगतो ) 


नाराधितासि विधिना विविधोपचारैः

किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः ।

श्यामे त्वव यदि किञ्चन मय्यनाथे

धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ॥ ९ ॥
हे श्यामवर्णे माते विविध उपचार करून मी तुझी पूजा तर केलीच नाही उलट अत्यंत कठोर
शब्दांनी मी तुझी निर्भत्सना केली. मी अश्या शब्दांचा वापर केला ज्याने कोणीही दुखावेल, तुझ्या
क्षमतेवर संशय घेतला. स्वतः निराधार असून सुद्धा मी तुझ्यावर अनेक आरोप केले असे असूनही तुझी
माझ्यावरील कृपादृष्टी अक्षय्य आहे माझे असे वर्तन असून सुद्धा तुला हे करुणामयी वागणे अत्यंत
शोभून दिसते कारण तू माझी आई आहेस. ( हा श्लोक नास्तिक लोकांच्या साठी आहे. नास्तिक
मंडळी ईश्वराला मानत तर नाहीच परंतु ते ईश्वरी अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. अत्यंत
असभ्य आणि अश्लाघ्य शब्दात ते ईश्वरी शक्तीची निंदा नालस्ती करतात. परंतु अश्या लोकांवर सुद्धा
आई म्हणून तुझी कृपादृष्टी कायम असते. )

आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवेशि ।
नैतच्छठत्वं मम भावयेथाः क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति ॥ १० ॥
हे दुर्गामाते मी संकटात बुडालो की लगेच तुझी आळवणी सुरु करतो. हा माझा स्वार्थ आहे असे
समजू नकोस कारण दयासागर माते प्रत्येक लहान बालकाला तहान आणि भूक लागली की
लगेच आईची आठवण येते अन्यथा तोवर ते खेळण्यात रममाण झालेले असते. अर्थात मी
प्रापंचिक खेळात रममाण होतो परंतु संकटात बुडालो की मी तुझी करुणा भाकणार आणि तू आई
आहेस, तू येऊन माझे संकट हरण कर. 

जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि ।

अपराधपरम्परावृत्तं न हि माता समुपेक्षते सुतम् ॥ ११ ॥
हे जगदंबे हि किती विचित्र गोष्ट आहे की मी असा दोषांनी परिपूर्ण असताना सुद्धा तुझा सतत माझ्यावर
कृपावर्षाव चालू असतो. मुलाने कितीही अपराध केले तरी आई काही मुलाचा त्याग करत नाही हेच
सत्य आहे. 

मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि ।

एवं ज्ञात्वा महादेवि यथा योग्यं तथा कुरु ॥ १२ ॥
या जगात माझ्या सारखा महापापी व्यक्ती दुसरा कोणी असणार नाही आणि जगात तुझ्या इतकी
महापातकांचा सुद्धा नाश करण्यास समर्थ दुसरी कोणी नाही. त्यामुळे हे ध्यानात घेऊन तू तुला योग्य
वाटेल ते कर. अर्थात माझ्या सारख्या पापी व्यक्तीचा सुद्धा उद्धार कर... 

आदि शंकराचार्य विरचित देवी अपराध क्षमापन स्तोत्र संपूर्ण II


©सुजीत भोगले 

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र आदि शंकराचार्य विरचित देवी अपराध क्षमापन स्तोत्र हे शरणागत भाव दर्शवणारे अत्यंत भावगर्भ आणि स...